ठळक घडामोडी

जिव्हाळा सेवाश्रमाचा दहावा वर्धापन दिन उत्साहात!

दहा मान्यवरांचा गौरव पुरस्काराने सन्मान

कुडाळ : प्रतिनिधी
      श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रमाचा दहावा वर्धापन दिन शनिवारी माड्याचीवाडी रायवाडी येथील जिव्हाळा सेवाश्रमात विविध उपक्रमांनी आणि गौरव सोहळ्याने उत्साहात साजरा करण्यात आला. समाजसेवेची दहा वर्षांची वाटचाल पूर्ण करताना सेवाश्रमाने सामाजिक बांधिलकी जपत कार्याचा ठसा उमटविल्याची भावना यावेळी व्यक्त झाली. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणा-या दहा मान्यवरांचा जिव्हाळा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
      वर्धापन दिनानिमित्त सकाळी १०.३० वाजता बॅरिस्टर नाथ पै महाविद्यालय संलग्न विद्यार्थ्यांच्या सहभागातून आणि ओटवणेकर यांच्या उपस्थितीत फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरानंतर लाभार्थ्यांना फळवाटप करण्यात आले तसेच दुपारी स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. जिव्हाळा सेवाश्रम संगीत विद्यालयाचे शिक्षक योगेश प्रभू व आनंद मोर्ये तसेच त्यांच्या शिष्या ऐश्वर्या चव्हाण व जुही यांनी स्वागतगीत आणि ईशस्तवन सादर करून वातावरण भक्तिमय केले. दुपारी ३ वाजता जिव्हाळा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. प्रमुख पाहुणे अॅड. अनिल बर्वे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्या आरती पाटील व पंचायत समिती सदस्या प्राची जळवी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
     यावेळी अभिनेत्री श्रद्धा खानोलकर, पत्रकार अजय सावंत, श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवणचे मुख्याध्यापक माणिक पवार, ग्लोबल फाऊंडेशन पिंगुळीचे संचालक प्रसाद परब, नाग्या म्हादू संस्था अध्यक्ष उदय आईर, नृत्य दिग्दर्शक रवी कुडाळकर, माड्याचीवाडी तलाठी वैशाली देसाई, ग्रामसेवक नितेश तांबे, नाट्यलेखक-दिग्दर्शक केदार देसाई तसेच आशासेविका साक्षी शेलटे या दहा आदर्श व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात आला. पुरस्कार वितरणानंतर संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गायन-वादन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच चि. अन्वेश बिर्जे याचा वाढदिवसही आनंदात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास माड्याचीवाडीचे सरपंच विघ्नेश गावडे, उपसरपंच अस्मिता गावडे, संतोष शेटगावकर, रामकृष्ण सामंत (मालवण), उपाध्यक्ष राजू बिर्जे, सुंदर मेस्त्री, अरूण परब, दत्तात्रय पाटकर, दिपाली पाटकर, संजय बिर्जे, संदीप बिर्जे, शोभा बिर्जे, गितांजली बिर्जे, आर्या बिर्जे, श्रेया बिर्जे, प्रशांत केरवडेकर, बाबा गावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी जिव्हाळा सेवाश्रमाच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष सुरेश बिर्जे यांनी अध्यक्षीय भाषणात सेवाश्रमाच्या कार्याचा आढावा घेतला. प्रस्तावना जयप्रकाश प्रभू यांनी केली, सूत्रसंचालन संतोष सांगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन साक्षी बिर्जे यांनी केले.

error: Content is protected !!