कस्तुरी पाताडे हिला वाहिली श्रद्धांजली : त्या घटनेची सखोल चौकशी व संबंधित डाॅक्टरांवर कडक कारवाईची केली मागणी
कुडाळ : कस्तुरी पाताडे या युवतीला श्रध्दांजली वाहताना कुडाळ मधील सजग नागरीक.
कुडाळ : प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील १९ वर्षीय युवती कु. कस्तुरी पाताडे हिचा खासगी रुग्णालयातील चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर, तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच खासगी डॉक्टरांच्या अनागोंदी व मनमानी कारभाराविरोधात आवाज उठविण्यासाठी रविवारी सायंकाळी कुडाळ येथील न्यायालयालगत असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिरात कुडाळ शहरातील सजग नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांनी कस्तुरी पाताडे हिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच कणकवलीतील संबंधित खासगी रूग्णालयातील त्या घटनेची सखोल चौकशी होऊन, मुंबई नर्सिंग अॅक्ट प्रमाणे त्या रूग्णालयाच्या डाॅक्टरांवर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी नागरीकांनी करीत याबाबत जिल्हाधिकारी व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीला अभय शिरसाट, अमित सामंत, काका कुडाळकर, धीरज परब, प्रसाद शिरसाट, रत्नाकर प्रभुतेंडोलकर, दादा पडते, संदेश पडते, उमेश परब, अॅड.आनंद गवंडे, अमोल प्रभू, योगेश राऊळ आदींसह सजग नागरिक उपस्थित होते.
अभय शिरसाट म्हणाले, कणकवली येथील एका खासगी रुग्णालयात चुकीच्या पद्धतीने केलेल्या शस्त्रक्रियेमुळे मृत्युमुखी पडलेल्या कु. कस्तुरी पाताडे व त्यानंतर त्या रूग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून मयताच्या नातेवाईकांना दिलेली उद्धट वागणूक व त्यानंतर घडलेला जनउद्रेक, रूग्णालयाची झालेली तोडफोड, नंतर तोडफोडी विरोधात जिल्हाभरातील खाजगी डाॅक्टरांनी निषेध करत आपली बंद ठेवलेली ओपीडी सेवा या सर्व संवेदनशील विषयावर
विचार विनिमय करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. खरतर त्या युवतीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी संबंधित डाॅक्टरांशी चर्चा करण्यासाठी त्या रूग्णालयात धाव घेतली होती. मात्र, त्यावेळी संबंधित डाॅक्टरांनी अरेरावीची भाषा वापरल्यानंतर नातेवाईक संतप्त होऊन पुढची घटना घडली. आम्ही तोडफोडीचे समर्थन अजिबात करीत नाही. पण ज्या घरात एखाद्याचा चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे दुर्दैवी मृत्यू होतो, त्यानंतर त्याचे नातेवाईक संतप्त होणे साहजिकच आहे. त्यामुळे डाॅक्टरांनीही या घटनेचा चुकीच्या पद्धतीने बागुलबुवा करण्याचा प्रयत्न करू नये. जेव्हा या घटनेनंतर जिल्ह्यातील खासगी डाॅक्टरांनी ओपीडी बंद ठेवली पण त्या युवतीला श्रद्धांजली वाहिली का?. घडलेली घटना हि दुर्दैवीच आहे. पण भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये, याबाबत दक्षता घेतली पाहिजे. त्यासाठी सगज नागरिक म्हणून आमच्या काही मागण्या आहेत, यात संबंधित त्या डाॅक्टराचे रजिस्ट्रेशन रद्द झाले पाहिजे. जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयातील काऊंटरवर दरपत्रक आणि नियमावली ठेवली पाहीजे. यासाठी जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असल्याचे अभय शिरसाट यावेळी म्हणाले.
अमित सामंत म्हणाले, जिल्ह्यातील सर्वच डाॅक्टर अशाप्रकारचा मनमानी कारभार करतात असे आपण म्हणत नाही. पण कस्तुरी पाताडे हिच्या निधनानंतर जवळपास ७० टक्के डाॅक्टर अशाप्रकारचा चुकीच्या पद्धतीने कारभार करतात अशा जिल्ह्यातील नागरिकांमधून प्रतिक्रिया उमटल्या. एका डाॅक्टराने तर मयत झालेल्या त्या युवतीच्या नातेवाईकांवर खोटा खंडणीचा आरोप केला. जर तसे असते तर तुम्ही गुन्हा का दाखल केला नाहीत?. ती तोडफोडीची घटना वैयक्तिक फायद्यासाठी नव्हती तर संबंधित डाॅक्टरांच्या उद्दामपणामुळे घडली. त्या घटनेची सखोल आणि निःपक्षपातीपणे चौकशी झाली होऊन संबंधित डाॅक्टरांना शासन झालेच पाहिजे. त्यामुळे याबाबत मुंबई नर्सिंग अॅक्ट प्रमाणे कारवाई व्हावी अशी आमची प्रमुख मागणी आहे.
काका कुडाळकर म्हणाले, आम्ही या घटनेचे अजिबात समर्थन करीत नाही. डाॅक्टर व डाॅक्टरांची सेवा या दोन्ही गोष्टी डाॅक्टरांच्या इच्छेनुसार अवलंबून आहेत. पण त्यांना चुकीच्या गोष्टींबाबत जाणीव करून देणे ही आपली जबाबदारी आहे. आपण डाॅक्टरांना देवदूत मानतो, पण त्यांच्याकडून अशाप्रकारचे चुकीचे वर्तन होणे योग्य नाही. एखाद्या रुग्णाचा मृत्यू होणे याबाबत आपल्या हातात काही नसतं पण त्यानंतर डाॅक्टरांची वर्तणूक चांगली असली पाहीजे. चुकीची वर्तणूक करणा-या डाॅक्टराला समज दिलीच पाहीजे पण सर्वच डाॅक्टरांचे मनोधैर्य खचता नये याचीही आपण दक्षता घेतली पाहिजे. त्यामुळे एक जबाबदार नागरिक म्हणून यंत्रणेवर आपला दबाव ठेवला पाहीजे. जिल्ह्यातील सरकारी आरोग्य यंत्रणा कमकुवत असल्याने सर्वानाच हि त्रासदायक बाब आहे. ती सुधारण्यासाठी आपण पाठपुरावा करूया. तसेच खासगी डाॅक्टरांचा कारभार सुधारण्यासाठी आपण दबाव ठेवला पाहीजे. त्यासाठी डाॅक्टरांच्या संघटना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूया.
धीरज परब म्हणाले, कस्तुरीच्या मृत्यूनंतर जी घटना घडली त्याचे आम्ही समर्थन करत नाही. या युवतीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर तिचे नातेवाईक डाॅक्टरांशी चर्चा करण्यासाठी त्या रूग्णालयात गेले असता संबंधित रूग्णालयातील डॉक्टरानेच नातेवाईकांना चप्पल दाखविण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच लोकांचा उद्रेक होऊन पुढची घटना घडली. त्यानंतर खासगी डाॅक्टरांनी जिल्हाभरात आपली ओपीडी सेवा बंद ठेवली. यावेळी एका डाॅक्टराने तर त्या युवतीच्या नातेवाईकांवर खंडणीखोर असा चुकीचा आरोप केला. एखाद्या सामान्य घरात जेव्हा घरातील एका सदस्याचे दुर्देवी निधन होते आणि त्याच घरातील नातेवाईकांवर खंडणीचा खोटा आरोप केला जातो, हे निषेधार्ह आहे. डाॅक्टरांची संघटनेनेही आपला सहकारी डाॅक्टर चुकला तर त्याला पाठीशी न घालता त्याचे कान टोचले पाहीजेत. तसेच सामान्य रुग्णांनाही योग्य न्याय दिला पाहीजे. जर डाॅक्टरच चुकीच्या पद्धतीने वागत असतील तर चुकीला माफी नाही. याविरोधात प्रत्येक तालुक्यात जनतेचा उद्रेक होईल. जर मुंबई नर्सिंग अॅक्ट प्रमाणे नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली तर अनेक डाॅक्टरांना पळता भुई थोडी होईल. त्यामुळे आपलेही हात दगडाखाली आहेत हेही डॉक्टरांनी लक्षात ठेवावे. त्यामुळे डाॅक्टरांनी कारभारात सुधारणा करणे आवश्यक आहे. डाॅक्टरांनी रुग्णांशी संवेदनशीलतेने वागले पाहीजे. रुग्णसेवेशी असलेली नैतिकता लक्षात ठेवून मुंबई नर्सिंग अॅक्टच्या नियमावलीनुसार सेवा दिली पाहीजे. समाजसेवेचा आपण एक घटक आहोत याचे भान ठेवले पाहीजे. जर चुकीच्या पद्धतीने कारभार झाल्यास रुग्णांच्या पाठीशी सजग नागरीक ठामपणे उभे राहतील, असा इशारा देत, कणकवलीतील त्या घटनेबाबत संबंधित रुग्णालयावर मुंबई नर्सिंग अॅक्ट प्रमाणे कारवाई व्हावी अशी मागणी धीरज परब यांनी यावेळी केली.
प्रसाद शिरसाट म्हणाले, कस्तुरीच्या दुर्देवी निधनानंतर जो प्रकार घडला तो दुःखदायक आणि निंदनीय आहे. तिच्या निधनानंतर तिच्याच नातेवाईकांना जो त्रास देण्याचा प्रयत्न झाला हे दुर्दैव आहे. जिल्ह्यातील सरकारी आरोग्य यंत्रणा कमकुवत झाली असल्यानेच आज रुग्णांना खासगी डाॅक्टरांकडे जावे लागत आहे. पण काही डाॅक्टरांचा मनमानी कारभार चालतो. काही वर्षापूर्वीच कुडाळ मधील आबा शिरसाट यांनी खासगी डाॅक्टरांच्या मनमानी कारभाराबाबत आवाज उठवला होता, याची आठवण त्यांनी यावेळी करून देत, खासगी रुग्णालयात दरपत्रक आणि नियमावली ठेवली पाहीजे. गंभीर रूग्ण आल्यास वेळ आणि सुट्टीचे कारण न देता त्या रुग्णावर उपचार केले पाहीजेत. त्याचबरोबर जिल्ह्यासह तालुक्यातील सरकारी आरोग्य सेवा सक्षम झाली पाहीजे. यासाठी आमदार आणि पालकमंत्री यांनी लक्ष दिले पाहीजे. किती वर्ष आम्ही गंभीर रूग्णांना उपचारासाठी गोवा बांबोळीला न्यायचे?.किती वर्ष आम्ही बांबोळी बघायची?. आरोग्य सेवेबाबत जिल्ह्यात नागरीकांना सक्षम पर्याय काय? असे सवाल त्यांनी उपस्थित करीत सरकारी आरोग्य सेवा सक्षम करण्याची मागणी केली.









