अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सादरीकरणाला दाद
बचत गटांच्या स्टॉल्सना नागरिकांची मोठी गर्दी
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ येथील सिंधुसरस प्रदर्शनाला मंगळवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहाची रंगत चढवली. महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली.
सायंकाळी पार पडलेल्या ‘खेळ पैठणी’ या विशेष कार्यक्रमालाही महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मालवण व देवगड तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कार्यक्रम रंगवला. तसेच चेतन गंगावणे प्रस्तुत कळसूत्री बाहुल्यांचा खेळ आणि ‘रंगी रंगला महाराष्ट्र’ या सदाबहार कार्यक्रमांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सिंधुदुर्गमार्फत उमेद अभियानांतर्गत कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या या जिल्हास्तरीय सिंधुसरस प्रदर्शन व मिनी सरस महोत्सवात जिल्ह्यातील ७५ बचत गटांनी स्टॉल्स उभारले आहेत. विविध घरगुती व हस्तकला उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली असून नागरिकांकडून खरेदीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दररोज आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांनाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रदर्शन परिसरात दिवसभर गर्दीचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, बुधवार दि. २५ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत बक्षीस वितरण व समारोप कार्यक्रम होणार असून या बहुरंगी प्रदर्शनाचा समारोप होणार आहे.









