कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर किल्ले सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज व आदिमाया भवानी मातेची भेट
गुढी, तोरणे, सडा, रांगोळी यासह ठिकठिकाणी पुष्पवृष्टी

मालवण : प्रतिनिधी ( महेश कदम )
मालवण तालुक्यातील ऐतिहासिक देवस्थान कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री देव रामेश्वर आपल्या वारेसूत्र, तरंग व रयतेसह हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांच्या ऐतिहासिक पारंपरिक त्रैवार्षिक भेट सोहळ्यासाठी शुक्रवारी किल्ले सिंधुदुर्ग येथे रवाना झाले. हजारो भाविकांच्या उपस्थितीत त्रैवार्षिक भेट सोहळा संपन्न झाला.
ठिकठिकाणी देवतांचा स्वागत सोहळा करण्यात झाला.यावेळी श्री देव रामेश्वर यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडून किल्ले सिंधुदुर्ग रहिवाशी संघाच्या वतीने नजराणा पेश करण्यात आला. हा ऐतिहासिक क्षण मालवण वासियांनी अनुभवला.
सकाळी ९ वाजता देव रामेश्वर यांचे आपल्या वारेसुत्र, तरंग व रयतेसह मालवणला प्रयाण केला, मार्गात सर्वत्र स्वागत करण्यात येत होते. दुपारी जोशीमांड मेढा, मालवण येथे प्रस्थान, नंतर समुद्रमार्गे किल्ले सिंधुदुर्ग येथे देव रामेश्वर, शिवाजी महाराज व आदिमाया भवानी माता यांचा ऐतिहासिक भेट सोहळा संपन्न झाला. सायंकाळी ४ नंतर देव दांडेश्वर मंदिर, दांडी येथे आगमन झाले, रात्री मौनीनाथ मंदिर, मेढा मालवण येथे मुक्काम आहे.
शनिवार 24 रोजी सकाळी ८ नंतर कुशेवाडा मेढा येथे प्रकाश कुशे यांच्या घरी कुशे कुटुंबियांना पारंपरिक भेट व आशीर्वचन, सकाळी १० नंतर रामेश्वर मांड, बाजारपेठ येथे आगमन, दुपारी १२ नंतर रामेश्वर मांड मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन, सायंकाळी ४ वाजता रामेश्वर मांड येथून रामेश्वर मंदिर, कांदळगाव येथे प्रयाण. असा सोहळा असणार आहे.
श्री देव रामेश्वर सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेल्यानंतर किल्ल्यावरील प्रमुख मानकरी कुटुंबिय यांच्याकडून स्वागत, त्यानंतर छत्रपतींकडून श्री देव रामेश्वराला नजराणा सर्व वारेसुत्रांचाही सन्मान करण्यात आला. देव रामेश्वर आपल्यावतीने छत्रपतींना सन्मानित केले. नंतर देव रामेश्वर आपल्या वारेसुत्र व भवानी मातेसह किल्ल्यातील सर्व मंदिरांना भेट देऊन आशीर्वाद आदान-प्रदान केले. याची देही याची डोळा पहावा असाच हा सोहळा ठरला. भाविक रयतेला किल्ल्यावर जाण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशन, मालवण, शिवशक्ती जलपर्यटन संस्था, मालवण दांडी येथील ग्रामस्थ यांच्यावतीने नाष्टयाची सोय करण्यात आली होती.









