ठळक घडामोडी

मामा वरेरकर नाट्यगृहासाठी कायम व्यवस्थापक नेमा !

मालवणातील कलाकारांची मागणी

मालवण : प्रतिनिधी
     मालवण नगरपालिका अखत्यारितील मामा वरेरकर नाट्यगृह येथे कायमस्वरुपी व पूर्णवेळ व्यवस्थापक नेमण्याची मागणी शहर व पंचक्रोशीतील स्थानिक कलाकारांनी केली आहे. याबाबत मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष ममता वराडकर यांना निवेदन देताना स्थानिक कलाकार श्रीरंग करवडकर, प्रथमेश सामंत, शुभम सकपाळ, ओंकार मालवणकर व इतर उपस्थित होते.
    निवेदनात म्हटले आहे, मामा वरेरकर नाट्यगृह हे मालवणच्या सांस्कृतिक जीवनाचे केंद्रस्थान असून अनेक नामवंत तसेच नवोदित कलाकार या मंचावरून घडले आहेत. मात्र, मागील काही दिवसांत नाट्यगृहाच्या स्वच्छता व व्यवस्थापनाबाबत प्रसारमाध्यमांतून नकारात्मक बातम्या प्रसिद्ध झाल्याने कलाकारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मामा वरेरकर नाट्यगृह येथे व्यवस्थापक म्हणून काम पाहणारे काही अंशी मर्जीचा कारभार करताना दिसून येतात. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच कुठे तरी मालवणचे व नाट्यगृहाचे नाव खराब झाल्याचे दिसत आहे. सध्या नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाबाबत काही तक्रारी पुढे येत असून नवोदित कलाकारांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे, आवश्यक परवानगीशिवाय नाट्यगृह उपलब्ध करून दिल्याच्या घटना घडल्याचे तसेच अतिरिक्त आर्थिक मागण्यांच्या तक्रारी होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या सर्व बाबींची सखोल चौकशी करून पारदर्शक व शिस्तबद्ध कारभारासाठी पात्र आणि जबाबदार कायमस्वरुपी व्यवस्थापकाची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नाट्यगृहाचे स्वरुप सुधारण्याबरोबरच व्यवस्थापनातही सकारात्मक बदल होणे गरजेचे असून यामुळे नगरपालिका, नाट्यगृह आणि स्थानिक कलाकार यांचे भले होईल, असा विश्वास कलाकारांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!