सिंधुदुर्ग – रत्नागिरीतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिरवल – कणकवलीत आंतरमहाविद्यालयीन फार्मसी महोत्सव
कणकवली : प्रतिनिधी
विजयराज नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल – कणकवली येथे आयोजित करण्यात आलेला ‘त्विषा 2.0’ हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अत्यंत उत्साहात व मोठ्या सहभागाने संपन्न झाला. या महोत्सवाच्या माध्यमातून फार्मसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक तसेच सांस्कृतिक गुणांना उजाळा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यात आले.
‘त्विषा 2.0’ हा महाराष्ट्रातील फार्मसी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचे दुसरे पर्व उपक्रम असून, असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया (एपीटीआय) – महाराष्ट्र राज्य (एपीटीआय-एमएस) यांच्या मार्गदर्शनाखाली फार्मसी शिक्षणात उत्कृष्टता, नाविन्य, संस्कृती आणि क्रीडा यांना प्रोत्साहन देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील फार्मसी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. फार्मसी विषयावर आधारित वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी औषधनिर्माण क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान, संशोधनाची वाढती भूमिका, फार्मासिस्टची सामाजिक जबाबदारी, औषध क्षेत्रातील नैतिकता तसेच भविष्यातील संधी व आव्हाने यावर अभ्यासपूर्ण आणि प्रभावी मांडणी केली. विद्यार्थ्यांची वक्तृत्वकला आणि विषयावरील सखोल समज उपस्थितांना विशेष भावली. तसेच फार्मसी व विज्ञान विषयातील मॉडेल मेकिंग स्पर्धा हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी औषधनिर्मिती प्रक्रिया, ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, जैवतंत्रज्ञान, मानवी शरीरातील औषधांचे कार्य तसेच वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित नाविन्यपूर्ण आणि माहितीपूर्ण मॉडेल्स सादर केली. प्रत्येक मॉडेलमागील संकल्पना आणि उपयुक्तता लक्षात घेऊन परीक्षक व उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
युवक कल्याण संघ, कणकवलीचे सचिव डॉ. रमन बाणे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “फार्मसी व विज्ञान क्षेत्रात केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे, तर व्यासपीठावर व्यक्त होण्याची क्षमता, संघभावना आणि नाविन्यपूर्ण विचार महत्त्वाचे आहेत. ‘त्विषा 2.0’ हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी निश्चितच दिशा देणारा आहे.” कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून प्रा. विनोदकुमार सावंत व प्रा. कृष्णात मोहिते यांनी अत्यंत चोख आणि पारदर्शक पद्धतीने काम पाहिले. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनात सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.
स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे –
वादविवाद स्पर्धेत श्रावणी बाणविलकर, विवेक परब व चैतन्य पवार – विजयराज नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल – कणकवली या महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक प्रियांका पवार, देवांगी कुबल, नमन शेख – पुष्पसेन सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, डिगस – कुडाळ यांनी मिळविला. फार्मसी व विज्ञान विषयातील मॉडेल मेकिंग व प्रेझेंटेशन स्पर्धेत वरद साटविलकर, दर्शना कालेकर – गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी, सावर्डे या महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळविला, तर द्वितीय क्रमांक शंकर शिंदे, विश्रुती विचारे – सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, तळवडे या महाविद्यालयाला मिळाला. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. राजेश जगताप, उपप्राचार्य डॉ. अमोल उबाळे, बी. फार्मसी विभागप्रमुख अमर कुलकर्णी, डी. फार्मसी विभागप्रमुख नमिता सागवेकर यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला. कार्यक्रम समन्वयक म्हणून प्रा. निखिल गजरे, प्रा. ऐश्वर्या पालव, प्रा. नेहा गुरव व प्रा. ऐश्वर्या कोचरेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यावेळी युवक कल्याण संघाचे अध्यक्ष वैभव नाईक, उपाध्यक्षा सौ.स्नेहा नाईक, सचिव डॉ. रमन बाणे तसेच व्यवस्थापकीय विश्वस्त मंदार सावंत यांनी उपस्थित राहून उपक्रमाच्या आयोजनाबद्दल कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.









