आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम; विविध उपक्रमांचे आयोजन
ग्रामपंचायत व उद्योजक जी.के.सावंत यांचा पुढाकार
कुडाळ : प्रतिनिधी
आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष स्नेह-संमेलन (गेट-टुगेदर) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १५ मार्च रोजी सकाळी १० वाजता न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर, ता. कुडाळ येथे हा कार्यक्रम होणार आहे.
ग्रुप ग्रामपंचायत नेरूर क. नेरूरचे सरपंच व उद्योजक जी. के. सावंत (माजी विद्यार्थी) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांना एकत्र आणून त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणे, आपुलकीचे वातावरण निर्माण करणे आणि त्यांना आनंदाचा क्षण देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चहापान व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वाहतूक व्यवस्थाही करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी १० वाजता होणार असून आमदार निलेश राणे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रमुख मान्यवर म्हणून कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, तहसीलदार सचिन पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सावंत, पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम, पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर, वीज वितरणचे सहाय्यक अभियंता श्री.शेळके, पशु व दुग्ध अधिकारी विष्णु कविटकर आदी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय कार्यक्रमात डॉ. प्रसाद देवधर (अध्यक्ष, भागीरथ प्रतिष्ठान – सिंधुदुर्ग) व डॉ. हर्षल सांगावकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य व जीवनशैलीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या स्नेह-संमेलनाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना एकत्र आणून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न असून परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.









