ठाकरे सेनेच्या पाठपुराव्याला यश : नगरसेवक मंदार शिरसाट यांची माहीती
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेनेच्या पाठपुराव्याने शहर बाजारपेठेतील धोकादायक वीज पोल महावितरणकडून बदलण्यात आले. तसेच शहरात मेन्टेनन्सची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत, अशी माहीती युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट यांनी दिली.
शहरातील वीज समस्यांबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेनेतर्फे अलीकडेच महावितरणच्या अधिका-यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधण्यात आले होते. यावेळी शहरातील धोकादायक वीज पोल तातडीने बदलण्यासह डीपी सेफ्टी बाॅक्स, व इतर दुरूस्तीची कामे पूर्ण करून शहरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी महावितरणकडे करण्यात आली होती. या चर्चेत दुरूस्तीची कामे तातडीने हाती घेण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले होते. त्यानुसार गेले आठ दिवस शहरात दुरूस्तीची कामे महावितरण विभागामार्फत जोरात सुरू आहेत.
दरम्यान, कुडाळ मुख्य बाजारपेठेतील काही लोखंडी वीज पोल गंजल्यामुळे धोकादायक झाले होते. यामुळे धोका निर्माण झाला होता. हा पोल शुक्रवारी महावितरणकडून तातडीने हटवून तिथे नवीन पोल उभारण्यात आला. यावेळी नगरसेवक मंदार शिरसाट यांच्यासह त्यांची टिम ऑन फिल्ड लक्ष ठेवून होती. धोकादायक वीज पोल बदलण्यासह दुरूस्तीची कामे करण्यात आल्याने व्यापारी व नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले.








