ठळक घडामोडी

कणकवलीत पहाटे चोरट्यांचा धुमाकूळ….!

पोलीस ठाण्याच्या जवळच सहा दुकाने फोडली; पोलिसांसमोर आव्हान

कणकवली : चोरीची घटना घडल्यानंतर तपास करताना पोलिस. (छायाचित्र : अनिकेत उचले, कणकवली)

कणकवली : प्रतिनिधी
     कणकवली शहरात शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत तब्बल सहा दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आचरा रोडसारख्या गजबजलेल्या परिसरात आणि सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही या चोऱ्या घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
       मिळालेल्या माहितीनुसार, आचरा रोडवरील सना कॉम्प्लेक्समधील तीन दुकाने तसेच त्यापासून काही अंतरावर असलेल्या बेंगलोर अय्यंगार बेकरीच्या शेजारील राज मेडिकलसह अन्य तीन दुकानांची शटर उचकटून चोरट्याने चोरी केली. विशेष म्हणजे हा परिसर नेहमीच वर्दळीचा असून काही अंतरावरच पोलीस स्टेशन आहे.
या धाडसी चोऱ्यांमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. चोरीला गेलेल्या मुद्देमालाची अचूक माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
    दरम्यान, या घटनेबाबत अद्याप अधिकृत तक्रार दाखल नसली तरी चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन गुन्हा उघड करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान या चोरीची घटना कळतात कणकवली पोलीसांनी चोरी झालेल्या मेडिकलमध्ये जात माहीती घेत सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
     *सीसीटिव्ह बंद*
शहरातील सीसीटीव्ही बंद असलेल्याचा फायदा उठवत चोरांचा धुमाकूळ सुरू असल्याची देखील चर्चा सुरू आहे. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हा प्रमुख तथा कणकवली नगरपंचायत उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी काही दिवसापूर्वीच याबाबत प्रसिद्धी पत्रक काढत कणकवली पोलीसांचे लक्ष वेधले होते.

error: Content is protected !!