दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी वृक्षप्रेमी नागरिक कुडाळ पोलीस ठाण्यात
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ शहरातील राजमाता जिजाऊ चौक नजिक माडेवाडा रस्त्यालगत उभ्या असलेल्या सुमारे दीडशे वर्षे जुन्या वटवृक्षाची फांदी अज्ञाताकडून तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, यामुळे कुडाळमधील पर्यावरणप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय व वृक्षप्रेमी नागरिकांनी गुरूवारी एकवटत कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट घेत, संबंधित दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात तशा आशयाचे निवेदनही पोलिसांकडे सादर करण्यात आले.
शहरातील राजमाता जिजाऊ चौक नजिक असलेला या ऐतिहासिक वडाच्या झाडाची मोठी फांदी सोमवारी (१५ डिसेंबर) पहाटे सुमारे पावणेतीनच्या सुमारास कटर मशीनच्या सहाय्याने तोडल्याचे निदर्शनास आले. सदर फांदी तोडण्याच्या प्रकारामुळे झाडाचे मोठे नुकसान झाले असून, यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकला असता, असे नागरिकांनी नमूद केले आहे. याआधीही कुडाळ शवविच्छेदन केंद्राकडे जाणा-या रस्त्यालगतची काही झाडे तोडण्यात आल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणी २९ मे २०२५ रोजी ग्रामीण रुग्णालय कुडाळ येथील वैद्यकीय अधीक्षकांनी गुन्हा दाखल करण्याचे पत्र दिले होते. मात्र, त्यावर ठोस कारवाई न झाल्यानेच अशा विघ्नसंतोषी प्रवृत्तीला पुन्हा बळ मिळाल्याचा आरोप यावेळी वृक्षप्रेमींनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी नागरिकांना दोन दिवसांची मुदत देण्याची विनंती करत, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. सदर घटनेचा तपास सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, शिंदे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मंदार श्रीकृष्ण शिरसाट, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, व्यापारी संघटना तालुकाध्यक्ष श्रीराम शिरसाट, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष मंदार चंद्रकांत शिरसाट, कुडाळ सुधार समिती अध्यक्ष प्रसाद शिरसाट, गोविंद सावंत, नितीश म्हाडेश्वर, संदीप म्हाडेश्वर, गुरू गडकर यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी व मोठ्या संख्येने वृक्षप्रेमी नागरिक उपस्थित होते.







