ठळक घडामोडी

मुंबई – गोवा महामार्गावर वेताळबांबर्डे पुलाजवळ कारला अपघात!

धुक्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले; कार सखल भागात उतरली

अरुंद लेन ठरतेय धोकादायक; अपघातांचा बनला हाॅटस्पाॅट

कुडाळ : प्रतिनिधी
      मुंबई-गोवा महामार्गावर पणदूरनजिक वेताळबांबर्डे पुलाजवळ आज सकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास मर्सिडीज कारचा अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघांना किरकोळ दुखापत झाली असून कारचे मोठे नुकसान झाले आहे. सकाळच्या सुमारास महामार्गावर दाट धुके पडले होते. त्यामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
      मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी मर्सिडीज कार वेताळबांबर्डे येथील पुलानजिकच्या अरुंद लेनवर आली असता चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कार वेगातच महामार्ग सोडून बाजूच्या सखल भागात जाऊन आदळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत कारमधील दोघांना तातडीने बाहेर काढले.
दरम्यान, गोव्याकडे जाणारी लेन त्या ठिकाणी अरुंद असल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गेल्या ५ ते ६ वर्षांपासून येथील लेनचे काम अपूर्ण असून त्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन काम पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

error: Content is protected !!