ठळक घडामोडी

कणकवलीत श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त भक्तीचा महासागर!

पालखी मिरवणुकीने शहर दुमदुमले

अखंड नामजप यज्ञ सप्ताहाची सुरुवात; विविध यज्ञ-विधींनी आध्यात्मिक वातावरण

कणकवली शहरातून काढण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ पालखी मिरवणुकीत सहभागी झालेले स्वामी भक्त व भाविक. (छाया – अनिकेत उचले)

कणकवली : प्रतिनिधी
      अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर (दिंडोरी प्रणित) कणकवली केंद्र येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त ९ ते १५ एप्रिल या कालावधीत अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी श्री स्वामी समर्थ महाराजांची भव्य पालखी मिरवणूक कणकवली शहरातून काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीने कणकवली शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बाजारपेठ- पटकीदेवी मार्गे जुना नरडवे रोड, मार्गांवरून लाकूड गिरणी समोर उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य मंडपापर्यंत काढण्यात आलेल्या या पालखी सोहळ्यात चांदीच्या रथात अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांची मूर्ती विराजमान होती. या सोबतच एका भक्ताने स्वामींची वेशभूषा केलेल्या आकर्षणाने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. पालखी मिरवणुकीत महिला,आबालवृद्धांसह मोठ्या संख्येने भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ‘स्वामी समर्था माझी आई मजला ठाव द्यावा पायी’ या नामघोषाने व भगव्या झेंडानी संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रम स्थळी भव्य दिव्य मंडप व विद्युतरोषणाई तसेच स्वामी समर्थांच्या पूजा प्रतिमेच्या ठिकाणी फुलांची नेत्रदीप अशी सजावट करण्यात आली आहे. याठिकाणी यज्ञ सप्ताहाच्या निमित्ताने गुरुवारी यज्ञभूमी मंडळ, देवता स्थापना, अग्नि स्थापना, स्थापित देवता हवन, नित्य स्वाहाकार आदी विधी पार पडले. शुक्रवारी नित्य स्वाहाकार, गणेशयाग व मनोबोध याग आयोजित करण्यात आले.
पुढील कार्यक्रमांमध्ये ११ एप्रिल रोजी चंडी याग, १२ एप्रिल रोजी स्वामी याग, १३ एप्रिल रोजी गीताई याग, १४ एप्रिल रोजी रुद्र याग व मल्हारी याग, तर १५ एप्रिल रोजी बली पूर्णाहूती व सत्यदत्त पूजनासह सांगता समारंभ होणार आहे.
दररोज सकाळी ५ वाजता सामूहिक गुरूचरित्र पारायण, ७.३० वाजता औदुंबर प्रदक्षिणा, ८ वाजता भूपाळी आरती, ८.३० वाजता नित्य स्वाहाकार, १०.३० वाजता नैवेद्य आरती, तसेच दुपारी व सायंकाळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सात दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमा नंतर सायंकाळी मार्गदर्शन कार्यक्रमाने या दिवसाची सांगता होईल.तर
या अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने सर्वांना करण्यात आले आहे.

error: Content is protected !!