ठळक घडामोडी

बोगस औषधांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे कोट्यवधींचे नुकसान; दोषींवर कारवाईची मागणी!

खासदार राजू शेट्टी यांचा कृषी आयुक्तांकडे पाठपुरावा; शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी

पुणे : येथील कृषी आयुक्त कार्यालयात  बैठकीत चर्चा करताना शेतकरी नेते राजू शेट्टी,आम.बाळा माने, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक व इतर.

कणकवली : प्रतिनिधी
     कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना बोगस व निकृष्ट खते आणि किटकनाशके पुरविणाऱ्या औषध कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी ठोस मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली. पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
     यंदाच्या हंगामात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व पालघर जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडले आहेत. औषध कंपन्यांच्या दरांवर शासनाचे नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुमारे ३०० कोटी रुपयांची औषधे खरेदी केली असून, योग्य मार्गदर्शनाअभावी खते, किटकनाशके, पीजीआर व बुरशीनाशकांचा चुकीचा वापर झाल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे.
       आंबा पिकासाठी तब्बल ७० हून अधिक कंपन्यांनी औषधांची विक्री केल्याने बाजारात किमतीत मोठी तफावत दिसून येत आहे. रोखीने खरेदी केल्यास ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत असल्याने व्यवहारातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुणनियंत्रण विभागाकडून केवळ मोजक्या कंपन्यांची तपासणी होत असल्याने बोगस औषध कंपन्यांचा सुळसुळाट वाढल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
      यावेळी आमदार बाळा माने यांनी संशोधन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, आंबा पिकांवरील किड-रोग नियंत्रणासाठी कोणते ठोस संशोधन करण्यात आले, तसेच बोगस कंपन्यांवर काय कारवाई झाली, याबाबत उत्तर मागितले. १९९० पासून फळबागांसाठी नाविन्यपूर्ण संशोधनाचा अभाव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनीही औषध विक्रेत्यांच्या भूमिकेवर टीका करत, शेतकऱ्यांच्या जीवावर कोट्यवधींचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांनी संकटाच्या काळात जबाबदारी घ्यावी, असे सांगितले. तसेच बाजारातील बोगस विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक दुकानाची तपासणी करावी, स्टॉक रजिस्टरची पाहणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
       या बैठकीला सुशांत नाईक, संचालक गुणनियंत्रक सुनील बोरकर, दापोली कृषी विद्यापीठाचे संशोधक अनिल देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, तसेच विविध पदाधिकारी, औषध कंपन्यांचे प्रतिनिधी आणि रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!