ठळक घडामोडी

मालवण समुद्रात एलईडी मासेमारीवर धडक कारवाई; दोन नौका जप्त!

सिंधुदुर्ग मत्स्य विभागाचा कठोर बडगा; अवैध मासेमारीविरुद्ध दहावी कारवाई

समुद्रात संयुक्त गस्त यशस्वी; गोवा-देवगडच्या नौका ताब्यात

मालवण : प्रतिनिधी
     मालवण समोरील समुद्रात गोवा व देवगड येथील एलईडी नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने धडक कारवाई केली असून नौका ताब्यात घेतल्या आहेत. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.
मालवण समुद्रात संयुक्त गस्तीत एलईडी मासेमारी करणाऱ्या दोन नौका जप्त करण्यात आल्यामुळे अवैध एलईडी मासेमारीविरुद्ध विभागाची कठोर भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. मागील आठवड्यात देखील गोवा आणि रत्नागिरी येथील नौकांवर कारवाई करण्यात आली आहे. सध्याच्या हंगामात ही एलईडी मासेमारीविरुद्धची दहावी मोठी यशस्वी कारवाई आहे.
बुधवार ८ एप्रिल रोजी रात्री मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी प्रतीक महाडवाला, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, सिंधुदुर्ग, कि. मा. वाघमारे, परवाना अधिकारी, देवगड व ग. शं. टेमकर, परवाना अधिकारी, मालवण हे मालवण समोर समुद्रात नियमित गस्त घालत होते. यावेळी देवगड येथील परवाना असलेली नौका चित्रा-१  नों. क्र.- आयएनडी- एम एच- ५ एमएम- ६८५ व अक्राजे नों. क्र.- आयएनडी- जीए -१ एमएम- ३९६२ द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण समोर अनधिकृतरित्या एलईडी लाईट व्दारे मासेमारी करत असताना पकडले. या दोन्ही नौकांवर नौका तांडेलसह एकूण अंदाजे ३५-४० खलाशी आहेत. या नौका जप्त करून देवगड बंदरात ठेवण्यात आल्या आहेत. नौकेवरील एलईडी लाईट सामग्री जप्त करण्यात आली आहे.
वादळी वारे आणि उंचच उंच लाटांच्या थरारक पार्श्वभूमीवर मालवण समुद्रात संयुक्त गस्ती दरम्यान अंमलबजावणी अधिकारी अंमलबजावणी अधिकारी प्रतीक महाडवाला, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, सिंधुदुर्ग, कि. मा. वाघमारे, परवाना अधिकारी, देवगड व ग. शं. टेमकर, परवाना अधिकारी, मालवण यांच्या पथकाने सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक मालवण व देवगड यांचे सहकार्याने सागर कुवेसकर, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे.

error: Content is protected !!