मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री, आमदार राहणार उपस्थित
संजय दत्त यांची उपस्थिती, सोनू निगम लाइर्व्ह कॉन्सर्टचेंही आयोजन
कणकवलीत चोख पोलीस बंदोबस्त

कणकवली : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी–सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस शुक्रवार, १० एप्रिल रोजी कणकवलीत भव्यदिव्य स्वरूपात साजरा होणार आहे. या निमित्ताने भाजप व महायुतीच्या वतीने अमृत महोत्सवी वर्ष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर सायंकाळी ६ वाजता कार्यक्रम रंगणार आहे.
या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री, आमदार आणि विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे हा सोहळा न भूतो न भविष्यती ठरेल. असा विश्वास महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
कार्यक्रमस्थळी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून, लाईटिंग व अन्य सुविधांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मान्यवरांसाठी विशेष आसनव्यवस्थाही करण्यात आली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मंत्री उदय सामंत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे आदी मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.
यावेळी वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छाऐवजी पुस्तक भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले असून, त्यासाठी विशेष व्यवस्था आणि सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत.सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त उपस्थित राहून प्रेक्षकांशी संवाद साधणार असून, त्यांचे प्रसिद्ध डायलॉग सादर करणार आहेत. तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांचा लाईव्ह कॉन्सर्ट हा कार्यक्रमाचा प्रमुख आकर्षण ठरणार आहे. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहरात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले असून, संपूर्ण शहर उत्सवी वातावरणात नटले आहे. या भव्य सोहळ्यासाठी मुख्यमंत्री व अन्य मान्यवर उपस्थित राहणार असल्याने कणकवली शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी गुरुवारी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांच्यासह अधिकारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.









