अलाईनमेंट बदण्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना निवेदन देणार
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांची माहीती
कणकवली : प्रतिनिधी
शक्तिपीठ महामार्गाची नवीन अलाईनमेंट राधानगरीमार्गे, आंबोली, बांदा, दोडामार्ग, पात्रादेवी अशी आहे. या मार्गाची अलाईनमेंट बदलून कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या तालुक्यांना कनेक्टिव्हीटी देण्यात यावी, जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह््याच्या विकासाला चालना मिळेल. त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह््यातून आणावा यासाठी लवकरच आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन देणार असल्याची माहिती कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली. सध्याचा शक्तिपीठ महामार्ग सिंधुदुर्गाच्या विकासाला घातक आहे, असे त्यांनी सांगितले.
कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पारकर बोलत होते. पारकर म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाची नवीन अलाईनमेंट केली जात आहे. यात प्रस्तावित मार्ग राधानगरी परिसराच्या जवळून जात आहे. त्यापुढे हा महामार्ग राधानगरीमार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उतरवावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. राधानगरी ते सिंधुदुर्ग अंतर सुमारे ३० किमी असून, हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ ला जोडावा किंवा ग्रीनफिल्ड संकल्पनेनुसार सह्याद्री पायथ्याशी समांतर नवीन मार्ग विकसित करून बांद्यापर्यंत नेण्यात यावा, असे त्यांनी सुचवले. या निर्णयामुळे सह्याद्री पायथ्याच्या गावांचा सर्वांगीण विकास, आर्थिक दळणवळण आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. महामार्गाची आखणी करताना कणकवली, ओरोस, कुडाळ आणि सावंतवाडी या शहराना थेट कनेक्टिव्हिटी देणे अत्यावश्यक असल्याचेही पारकर यांनी नमूद केले. तसेच प्रस्तावित संकेश्वर-रेड्डी चौपदरीकरण आणि घोटगे-पाटगाव महामागार्शी जोडणी केल्यास सिंधुदुर्ग-कोल्हापूर प्रवासाचा कालावधी सध्याच्या ३ ते ३.५ तासांवरून अवघ्या १ ते १.५ तासांवर येऊ शकतो, असा दावा त्यांनी केला. शक्तिपीठ मार्गाच्या सध्या अलाइनमेंटमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन आणि व्यापाराच्या दृष्टीने थेट फायदा होत नसून त्याचा अधिक लाभ गोव्याला होत असल्याची टीका त्यांनी केली. हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाचा असल्याने त्याचा प्रथम फायदा राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यालाच व्हावा, ही आमची ठाम भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग हा राज्यातील महत्त्वाचा पर्यटन जिल्हा असून, या महामागार्मुळे गोव्याऐवजी सिंधुदुर्गातील पर्यटनाला चालना मिळणे आवश्यक आहे. राधानगरीमार्गे मार्ग दिल्यास सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला, सावंतवाडीतील मोती तलाव व राजवाडा, दाजीपूर अभयारण्य, आंबोली व सावडाव धबधवा, रांगणागड तसेच देवगड मालवण वेगुर्ला किनारपट्टी या पर्यटन स्थळांना मोठा फायदा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ‘शक्तिपीठ’ संकल्पनेनुसार कुणकेश्वर, आंगणेवाडी, माणगाव दत्त मंदिर, वालावल लक्ष्मीनारायण मंदिर आणि धामापूर येथील भगवती मंदिर यांसारख्या धार्मिक स्थळांनाही थेट लाभ होऊन धार्मिक पर्यटनात वाढ होईल, असे त्यांनी नमूद केले. सध्या कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे येथून मोठ्या प्रमाणात पर्यटक सिंधुदुर्गात येत असून, राधानगरीमार्गे कनेक्टिव्हिटी दिल्यास ही संख्या आणखी वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जर महामार्ग थेट गोव्यात उतरवला, तर पर्यटक सिंधुदुर्ग टाळून थेट गोव्यात जातील, ज्यामुळे जिल्ह्याचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. भविष्यात पयार्यी मार्ग विकसित झाल्यास एनएच ६६ वरील वाहतूक कमी होऊन कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, ओरोस आणि कसाल या शहरावर आर्थिक परिणाम होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली, राधानगरीमार्गे मार्ग देऊन चिपी विमानतळ (सिंधुदुर्ग एअरपोर्ट) तसेच देवगड आणि रेडी बंदरांशी जोडणी केल्यास संपूर्ण कोकणच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास पारकर यांनी व्यक्त केला.







