एक जण बेपत्ता तर दोघांना वाचवण्यात यश
वेंगुर्ला : प्रतिनिधी
अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा – केरवाडी येथील समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली बोट उलटून मोठी दुर्घटना घडली. या अपघातात केरवाडी येथीलच राजन सारंग (४६) हे समुद्रात बेपत्ता झाले आहेत. तर होडीचे मालक प्रकाश सारंग व त्यांचा मुलगा दाजी सारंग यांना वाचवण्यात दुसऱ्या होडीला यश आले आहे. हि घटना आज रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.
वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा केरवाडी येथून नेहमीप्रमाणे एकाच कुटुंबातील प्रकाश सारंग, त्यांचा मुलगा दाजी व त्यांचा भाऊ राजन सारंग हे मच्छिमारीसाठी समुद्रात गेले होते. यावेळी पहाटे अचानक झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे त्यांची मच्छिमारी करणारी बोट बुडाली. यात प्रकाश सारंग व त्यांचा मुलगा बोटीवर असणाऱ्या ऑइल टँकर मध्ये राहिले. यानंतर त्यांना वाचवण्यात दुसऱ्या बोटीला यश आले. मात्र राजन सारंग हे खोल समुद्रात बुडाले. प्रशासन व स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने समुद्रात त्यांचे शोधकार्य सुरु आहे. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. केरवाडी येथील मच्छिमार सीसायटीचे चेअरमन काशिनाथ नार्वेकर यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.









