सागरी पर्यटन हंगाम अंतिम टप्प्यात; मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल
वेंगुर्ले, मालवण, देवगड तालुक्यात पर्यटकांची रेलचेल

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी पर्यटन हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून राज्यासह देश-विदेशातील पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मे महिन्यातील उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वेंगुर्ले, मालवण, देवगड तालुक्यातील सर्वच समुद्रकिनारे, वॉटर स्पोर्ट्स केंद्रे तसेच ऐतिहासिक पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. पर्यटक पर्यटनासह मालवणी जेवणाचाही मनमुराद मेजवानी घेत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला यंदाचा पर्यटन हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहोचला असून उन्हाळी सुट्ट्याही संपत आल्या आहेत. त्यामुळे हंगाम संपण्यापूर्वी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी सर्वच समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.
एप्रिल-मे महिन्यातील सुट्टीच्या हंगामात दरवर्षी पर्यटक कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होतात. यंदाही मोठ्या प्रमाणात पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले. सध्या वेंगुर्ले, सागरेश्वर, मोचेमाड, शिरोडा-वेळागर, खवणे, भोगवे, निवती, मालवण, दांडी, देवबाग, तारकर्ली, चिवला, आचरा बीच, देवगड तालुका आदी ठिकाणच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. निळाशार समुद्र, स्वच्छ किनारे आणि निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.
यासोबतच कायाकिंग, वॉटर स्पोर्ट्स, समुद्र सफर, स्कुबा डायविंग यांसारख्या साहसी पर्यटनाचाही पर्यटक आनंद घेत आहेत. तसेच मालवण मधील सिंधुदुर्ग किल्ला, राजकोट किल्ला भ्रमंती, राॅक गार्डन, निवती राॅक, वेंगुर्लेतील झुलता पूल यांसह धार्मिक पर्यटन ठिकाणीही पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक पर्यटक बोट सफरीसह समुद्रातील विविध साहसी खेळांचा आनंद घेत आहेत.
सिंधुदुर्गातील मालवणी खाद्यसंस्कृतीचाही पर्यटक मोठ्या प्रमाणात आस्वाद घेत आहेत. सी-फूड, मालवणी थाळी, कोंबडी-वडे, सोलकढी यांसारख्या पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल व खानावळींमध्ये मोठी गर्दी होत आहे. काही ठिकाणी जेवणासाठी पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पर्यटनामुळे जिल्ह्यातील हॉटेल व्यवसाय, होम-स्टे, बोट मालक, स्थानिक व्यावसायिक, वाहन चालक तसेच वॉटर स्पोर्ट्स व्यवसायिकांच्या अर्थकारणाला मोठा हातभार लागत आहे. जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा मोठा वाटा असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
दरम्यान,दोन – तीन महिने पूर्ण क्षमतेने सुरू असलेला पर्यटन हंगाम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला असून उन्हाळी सुट्ट्याही संपत आल्या आहेत. त्यामुळे हंगाम संपण्यापूर्वी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी सध्या पर्यटक मोठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल होत आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सागरी मंडळाने दिलेल्या आदेशानुसार मालवण सागरी बंदर परिसरातील जलवाहतूक व वॉटर स्पोर्ट्स सेवा २६ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत बंद राहणार आहेत. त्यामुळे त्यापूर्वीच पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गात गर्दी केल्याचे दिसून येत आहे.









