कुडाळ बसस्थानकात सोनसाखळी चोरीचा प्रयत्न हाणून पाडला; चालक गावडेंची सतर्कता
प्रसंगावधान राखत युवतीची सोनसाखळी वाचवली; प्रशांत गावडे यांचे सर्वत्र कौतुक
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ एसटी आगाराचे चालक प्रशांत गावडे (रा.नेरूर) यांनी मंगळवारी (१९ मे) कुडाळ बसस्थानकात कुडाळ – मालवण गाडीमध्ये चढणा-या युवतीची सोनसाखळी चोरणा-या एका परप्रांतीय इसमास प्रसंगावधानाने पकडून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. एसटी चालक प्रशांत गावडे यांच्या या धाडसाबद्दल बुधवारी कुडाळ भारतीय जनता पार्टीच्या वतीने जेष्ठ कार्यकर्ते राजू राऊळ व उपसभापती तुकाराम तेली यांच्या हस्ते शाल व पुष्पगुछ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जेष्ठ कार्यकर्ता सेलचे जिल्हा संयोजक निलेश तेंडुलकर, सेवाशक्ती एसटी कर्मचारी संघटनेचे कुडाळ आगार अध्यक्ष जयेश चिंचळकर, जिल्हा कोषाध्यक्ष चारुदत्त देसाई, तेंडोली पंचायत समिती सदस्य मंगेश प्रभू, कुडाळ आगारातील एसटी वाहक दिनेश शिरवलकर, माजी नगरसेवक सचिन काळप, नगरसेवक निलेश परब, माजी नागरसेवक सुनील बांदेकर, युवामोर्चा तालुकाध्यक्ष तन्मय वालावलकर, मुक्ती परब, श्रावण शिरसाट व शशिकांत आरोलकर उपस्थित होते.
मंगळवारी दुपारी २.२० वाजताच्या सुमारास फलाटावर लागलेल्या कुडाळ – मालवण एसटी बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली. त्याच गर्दीचा फायदा उठवत एक संशयित इसम बसमध्ये चढणा-या युवतीच्या गळ्यातील सोनसाखळी तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्याच बसच्या बाजूला फलाटावर लागलेल्या कुडाळ – पणजी बसचे चालक प्रशांत महादेव गावडे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सतर्कता दाखवत बसमधून खाली उतरून सदर संशयितरित्या वावरणाऱ्या त्या इसमाला हटकले. त्यावर त्या इसमाने तो मी नव्हेच ची भूमिका घेतली. मात्र युवतीनेही गळ्यातील चेन खेचण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले. कुडाळ पोलिसांनाही पाचारण करीत त्या इसमाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याला गाडीतून पोलीस ठाण्यात नेत पुढील कार्यवाही केली. एसटी बस चालक गावडे यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. त्यांच्या धाडसाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.









