कुडाळ गटविकास अधिका-यांची भेट घेत चर्चा
कुडाळ : प्रतिनिधी
झाराप सरपंच दक्षता मेस्त्री यांच्यावरील अविश्वास ठरावाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर मेस्त्री यांनी बुधवारी आपला पदभार पुन्हा स्विकारला. मात्र अविश्वास ठराव मांडणा-या सदस्यांसह ग्रामस्थांनी गुरूवारी कुडाळचे गटविकास अधिकारी मनोज भोगटे यांची भेट घेऊन, याबाबत प्रशासनाला जाब विचारला. प्रशासनाने कोणत्या अधिनियमाला धरून त्यांच्याकडे पदभार दिला? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या आदेशानुसार सरपंचांकडे चार्ज देण्यात आल्याचे गटविकास अधिका-यांनी स्पष्ट केले. परंतु प्रशासनाच्या या निर्णयावर उपस्थित सदस्यांसह ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
झाराप सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या विरोधात काही सदस्यांनी अविश्वास ठराव मांडला. त्यानंतर प्रशासनाने आयोजित केलेल्या विशेष ग्रामसभेत झालेल्या गुप्त मतदान प्रक्रियेत सरपंच मेस्त्रींच्या विरोधात बहुमत मिळाल्याने त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर मेस्त्री यांनी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेत आपली बाजू मांडली. त्यानंतर जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सरपंच दक्षता मेस्त्री यांच्यावरील अविश्वास ठरावाला तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर बुधवारी प्रशासनाने त्यांच्याकडे सरपंच पदी हजर करून घेतले. त्यानंतर अविश्वास ठराव मांडणा-या सदस्यांसह ग्रामस्थांनी गुरूवारी कुडाळ पंचायत समितीत धाव घेत गटविकास अधिका-यांना याप्रश्नी विचारणा केली. सदस्यांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर विशेष ग्रामसभेने बहुमत दिले असतानाही तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी तात्पुरती स्थगिती दिली असतानाही प्रशासनाने त्यांना कोणत्या अधिनियमाखाली परत त्यांना सरपंच पदाचा कार्यभार कसा काय सोपवला? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर गटविकास अधिका-यांनी आपल्याला जिल्हाधिकारी व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश असल्याने पुढील कार्यवाही करण्यात आल्याचे सांगण्यात आल्याचे समजते. यावेळी ग्रा.पं.सदस्य अश्पाक कुडाळकर, विजय हरमलकर, संजीवनी पेंडूरकर, ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, माजी उपसभापती बबन बोभाटे, जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर, अतुल बंगे व झाराप ग्रामस्थ उपस्थित होते.









