अनियंत्रित गाडी संरक्षक कठड्याला धडकत झाली पलटी
दोघांना दुखापत; गाडीचे मोठे नुकसान
कुडाळ : प्रतिनिधी
मुंबई – गोवा महामार्गावर पणदूर येथे आज दुपारी १२.३० च्या सुमारास भरधाव बोलेरो गाडीला अपघात झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका बोलेरो गाडीचा ताबा सुटल्याने ती रस्त्याशेजारील संरक्षक कठड्यावर जोरात आदळली. त्यानंतर महामार्गावर पलटी झाली. या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, सदर बोलेरो गाडी गोव्याकडून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास पणदूर येथील ब्रिज पास केल्यानंतर तेथे असलेल्या पुलाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी, गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या कठड्यावर जाऊन जोरात धडकली. धडक इतकी भीषण होती की गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. ओरोस सायबर सेलचे पोलीस निरीक्षक गणेश क-हाडकर यांनी ग्रामस्थांच्या सहाय्याने जखमींना तातडीने बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.









