सांस्कृतिक ठिकाणी मद्यपान करणे भोवले;पर्यटकांना माफी मागावी लागली
मालवण : महेश कदम
मालवण शहरातील मामा वरेरकर नाट्यगृहाच्या प्रांगणात गाडी पार्किंग करून नाट्यगृहाच्याच पायऱ्यांवर बसून भर दुपारी दारू पार्टी करणाऱ्या पर्यटक तरुणांना मालवणमधील जागरूक नागरिक व नाट्यप्रेमींनी चांगलाच धडा शिकवल्याची घटना आज घडली.
मालवण शहरातील मामा वरेरकर नाट्यगृहाच्या प्रांगणात आज शनिवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास एका पर्यटक ग्रुपने आपली गाडी पार्क केली. या गाडीतील काही तरुणांनी गाडीतून उतरून नाट्यगृहाच्या पायऱ्यांवर बसून दारू पिण्यास सुरुवात केली. तसेच दारूच्या बाटल्याही नाट्यगृह परिसरात टाकत होते. हा प्रकार लक्षात येताच काही मालवणमधील काही जागरूक नागरिक व नाट्यप्रेमी यांनी त्याठिकाणी धाव घेतली. मालवणच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या मामा वरेरकर नाट्यगृहाच्या पायऱ्यांवर बसून दारू पिली जात असल्याचे पाहून नागरिक व नाट्यप्रेमी संताप अनावर होऊन त्यांनी त्या मद्यपी पर्यटक तरुणांची कानउघडणी करत चांगलाच प्रसाद दिला. तसेच त्या पर्यटकांना उठाबशा काढायला लावून व माफी मागण्यास भाग पाडून पुन्हा असे प्रकार करणार नाही असे त्यांच्या तोंडून वदवूनही घेतले. सांस्कृतिक स्थळी नशाबाजी करणाऱ्या पर्यटकांना दणका दिल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.









