ठळक घडामोडी

शिवापूर मधील २५ ज्येष्ठ नाट्य कलाकारांचा गौरव!

मुंबईच्या स्मित-दत्त फाउंडेशनतर्फे कलाकार सन्मान सोहळा

‘भावसंगम’ काव्यसंग्रह प्रकाशनाने शिवापूर पंचक्रोशीत आनंदोत्सव

कुडाळ : प्रतिनिधी
          रंगभूमी आणि नाट्य क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या आणि आपल्या कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या कुडाळ तालुक्यातील शिवापूर येथील २५ ज्येष्ठ नाट्य कलाकारांचा ‘स्मित-दत्त फाउंडेशन, मुंबई’ यांच्या वतीने नुकताच गौरव करण्यात आला. श्री देव भैरव-जोगेश्वरी मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमाचे औचित्य साधून या भव्य गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
          याच कार्यक्रमादरम्यान शिवापूर येथील कन्या प्रियांका अनिल बांग आणि शिवानी शेडगे यांच्या ‘भावसंगम’ या संयुक्त काव्यसंग्रहाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले. एकाच मंचावर गावातील ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान आणि तरुण पिढीच्या साहित्य कृतीचे प्रकाशन झाल्याने शिवापूर पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण आहे.
       या सोहळ्यासाठी श्री देव भैरव-जोगेश्वरी मंदिराच्या विश्वस्त कमिटीचे बहुमूल्य सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्मित-दत्त फाउंडेशनचे अध्यक्ष  संतोष दत्ताराम सुके यांनी संस्थेच्या विविध सामाजिक व सांस्कृतिक उद्दिष्टांची माहिती देऊन उपस्थितांचे स्वागत केले व कार्यक्रमाची सुरुवात केली. तर संस्थेच्या सेक्रेटी सौ. साक्षी सुके यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व ग्रामस्थांचे, रसिकांचे आणि देवस्थान कमिटीचे आभार व्यक्त केले.
मंदिराला महालक्ष्मी देवीची प्रतिमा अर्पण
       या मंगल प्रसंगी स्मित-दत्त फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने श्री देव भैरव-जोगेश्वरी मंदिरास कोल्हापूरची प्रसिद्ध श्री महालक्ष्मी देवीची अत्यंत भव्य आणि आकर्षक प्रतिमा भेट म्हणून अर्पण करण्यात आली. या सोहळ्याला शिवापूर आणि परिसरातील ग्रामस्थ, नाट्यप्रेमी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!