दोडामार्ग – सासोलीतील तिलारी कालव्याजवळ घटना
वाहनधारकांत भीतीचे वातावरण; वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी
दोडामार्ग : प्रतिनिधी
दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव येथे जत्रेसाठी निघालेल्या एका कुटुंबाच्या धावत्या अल्टो कारवर अचानक गवारेडा धडकल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. सासोली येथील तिलारी कालव्याजवळ ही दुर्घटना घडली असून कारमधील एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तसेच कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
मोरगाव येथे श्री देव म्हाताराबाबाचा सोमवारी वर्धापनदिन होता. रात्रीच्या सुमारास काहीजण त्यांच्या अल्टो कारने या वर्धापनदिनास जात होते. दोडामार्ग ते बांदा राज्य मार्गावरील सासोली येथील तिलारी कालव्याजवळ आले असता अचानक एक गवा रेडा त्यांच्या धावत्या कारला धडकला. धडक इतकी जबर होती की गवारेडा काही वेळ गटारात पडला. मात्र नंतर तो जंगलाच्या दिशेने पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदत करून जखमी महिलेला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या मार्गावर वन्यप्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेता वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.









