ठळक घडामोडी

सरंबळमध्ये वीज कोसळून घराचे नुकसान; जि.प.सदस्य रुपेश पावसकरांची धाव!

पावशीत गोठ्यावर तर भडगांवात घरावर झाड पडून मोठे नुकसान

कुडाळ तालुक्यात सलग तिस-या दिवशीही अवकाळी पाऊस; कुपवडे परिसरात वादळी वाऱ्याने दाणादाण

कुडाळ : प्रतिनिधी
        कुडाळ तालुक्यात आज शनिवारी सायंकाळी सलग तिसऱ्या दिवशीही वीज गडगडाटासह अवकाळी पाऊस कोसळला. शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने काही काळ उकाड्यापासून दिलासा मिळाला; मात्र आंबा, काजू, कोकमसह कोकणी मेव्याचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वीज, दूरध्वनी व इंटरनेट सेवा विस्कळीत झाली.
      सरंबळ दुर्गावाड धनगरवाडी येथे रामा बापू वरक यांच्या घरावर व माडावर वीज कोसळून घराचे पत्रे, इलेक्ट्रॉनिक वायरिंग जळाले तर माडाचे झाडही जळून नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य रूपेश पावसकर यांनी घटनास्थळी भेट देत आर्थिक मदत केली. यावेळी माजी उपसरपंच समद मुजावर, सरंबळ सरपंच रावजी कदम, उपसरपंच सागर परब, ग्राम महसूल अधिकारी संतोष हिंदक, स्नेहल सागरे, शैलेश परब, मंदार परब, फिरोज फतीब आदी उपस्थित होते. 
    भडगाव बुद्रूक येथे वादळी वाऱ्याने अनिल कदम यांच्या घरावर माड कोसळून घराचे छप्पर व मंडपाचे नुकसान झाले. तसेच पावशी धरणवाडी येथे शेतकरी बबन तोटकेकर यांच्या गुरांच्या गोठ्यावर आंब्याचे झाड पडून दीड लाखांहून अधिक नुकसान झाले. सुदैवाने गुरे बाहेर असल्याने जीवितहानी टळली. पावशीचे माजी सरपंच बाळा कोरगावकर, उपसरपंच लक्ष्मीकांत तेली, पोलीस पाटील अरविंद बिले यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी ओंकार शेलटे, बाळा कुडतरकर, पांडुरंग धुरी, शैलेश कोरगावकर, दळवी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, कुपवडे – घोडगे पंचक्रोशीत वीज खांब व वाहिनीवर झाडे पडल्याने परिसरातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता.

error: Content is protected !!