ठळक घडामोडी

तिलारी घाटात अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला!

परिसरात खळबळ; पोलिसांकडून तपास सुरू

दोडामार्ग : प्रतिनिधी
         तिलारी घाट परिसरात आज शुक्रवारी एका अनोळखी महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. वीज निर्मिती प्रकल्पाच्या जलवाहिनीवरील प्रेशर पॉईंटकडे जाणाऱ्या दुर्गम रस्त्यालगत झाडीमध्ये हा मृतदेह आढळून आला. संबंधित महिलेचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
      काही नागरिक त्या भागात गेले असता परिसरातून तीव्र दुर्गंधी येत होती. यानंतर त्यांनी परिसरात पाहणी केली असता रस्त्याच्या बाजूच्या झुडपात महिलेचा मृतदेह पडलेला दिसून आला. घटनेची माहिती मिळताच कळसगादे येथील पोलीस पाटील सदानंद विठू सुतार यांनी चंदगड पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक आकाश भिंगारदिवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी चंदगड ग्रामीण रुग्णालयात रवाना केला.
      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेच्या अंगावर मोरपंखी रंगाची सोनेरी साडी व लालसर-सोनेरी ब्लाऊज होता. तसेच पायात पैजण आणि जोडेही आढळून आले. मात्र मृतदेह मोठ्या प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत असल्याने तिची ओळख पटविण्यात अडचणी निर्माण होत आहेत. संबंधित महिला बेपत्ता असल्याची कुठे नोंद आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत.
     तिलारी घाट परिसर हा दाट जंगल, खोल दऱ्या आणि निर्मनुष्य रस्त्यांमुळे संवेदनशील मानला जातो. यापूर्वीही या भागात महिलांचे तसेच वाहनचालक आणि वाहकांचे सांगाडे आढळून आल्याच्या घटना घडल्या आहेत. घाट परिसरात तपासणी नाका नसल्यामुळे बाहेरील भागातून मृतदेह आणून येथे टाकले जात असल्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. तिलारी जलविद्युत प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या जलवाहिनीच्या परिसरात हा प्रकार घडला आहे. येथे दाट झाडी असून, सामान्यतः या मार्गावर फारशी वर्दळ नसते. काही तरुण-तरुणी अधूनमधून या परिसरात येत असल्याचे सांगितले जाते. अशाच काही जणांना दुर्गंधी जाणवल्याने हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे तिलारी घाट परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून या घटनेचा सर्व बाजूंनी तपास सुरू करण्यात आला आहे.

error: Content is protected !!