ग्रामस्थांचा ऐतिहासिक उपक्रम चर्चेत
रवळनाथ मंदिर परिसरात उभारण्यात आल्याने चर्चेला उधाण
कणकवली : प्रतिनिधी
शहरातील नागवे रोडवरील रवळनाथ मंदिर परिसरात वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली असून, हा उपक्रम सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे हा पुतळा रातोरात उभारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
या उपक्रमासाठी परिसरातील ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याचे समजते. पुतळ्याच्या पाठीमागे ‘वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक’ असा फलकही लावण्यात आला असून, यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक ओळख मिळाली आहे. या निर्णयामुळे परिसरात इतिहासाची जपणूक होण्याबरोबरच तरुण पिढीला प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, ज्या ठिकाणी पुतळा उभारण्यात आला आहे, त्या ठिकाणची मातीही या वीर पुरुषाच्या नावे ओळखली जाते.अशी देखील चर्चा शहरात रंगत आहे.कणकवली शहराच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ग्रामीण भागात या राजाला,सन्मान देणारे नागरिक अधिक असल्याने हे ठिकाण निवडण्यात आल्याची चर्चा आहे. गेल्या काही वर्षांपासून या पुतळ्याच्या उभारणीसाठी संबंधित समाज बांधवांकडून कणकवली नगरपंचायतीकडे पाठपुरावा सुरू होता. मात्र, प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अखेर ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत हा पुतळा उभारल्याचे दिसून येत आहे.
रवळनाथ मंदिर हे ग्रामदैवत मानले जाणारे ठिकाण असल्याने, याच परिसरात उभारण्यात आलेला हा पुतळा अधिक महत्त्वाचा ठरत आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, सुसंस्कृत्व,विचारवादी या शहराच्या वैभवात भर घालणारा हा उपक्रम ठरणार असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.









