ठळक घडामोडी

कुडाळ कचरा डेपो आगप्रकरणी आमदार निलेश राणे आक्रमक!

‘एनसी’वर नाराजी; तात्काळ ‘एफआयआर’ दाखल करण्याचे निर्देश

विकास आराखडा आठ दिवसांत सादर करण्याच्या प्रशासनाला सूचना

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपोला लागलेली आग गुरूवारी दुसऱ्या दिवशीही धुमसत होती. दरम्यान दुपारी आमदार निलेश राणे यांनी या कचरा डेपोला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासकीय कारभाराबाबत आक्रमक पवित्रा घेतला. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना याप्रकरणी जाब विचारला असता ते निरुत्तर झाले. दरम्यान, ही आग लावली गेली असल्याच्या संशयावरून केवळ ‘NC’ नको, तर संशयितांविरुद्ध तत्काळ ‘FIR’ दाखल करण्याचे निर्देश आमदार राणे यांनी यावेळी प्रशासनाला दिले.
कचरा डेपोला काल बुधवारी लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी नगरपंचायतीचे प्रयत्न सुरू असले, तरी या धुरामुळे स्थानिक जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आज आमदार निलेश राणे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपस्थित नगरसेवकांनी प्रशासनाच्या बेजबाबदार कामाचे पाढा वाचला. विकास कामांचा कोणताही ठोस आराखडा नसल्याने आणि जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने आमदार निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली.
      “आपण प्रशासकीय अधिकारी आहात, जनतेच्या अडचणी दूर करणे ही तुमची प्राथमिक जबाबदारी आहे,” अशा शब्दांत आमदार राणे यांनी औंधकर यांना सुनावले. तसेच, कुडाळच्या विकासासाठी आणि समस्या निवारणासाठी आजवर नेमका काय आराखडा तयार केला आहे, याची माहिती आठ दिवसांत नगरसेवकांची बैठक घेऊन सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.
कचरा डेपोला आग कोणी लावली नसावी ना, या संशयाने कुडाळ पोलिसांत केवळ ‘NC’ दाखल करण्यात आली होती. मात्र, आमदारांनी यावर तीव्र आक्षेप घेत कुडाळ मुख्याधिकारी (CEO) औंधकर यांना FIR करण्याचे निर्देश दिले. आमदार निलेश राणे यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे पीआय राजेंद्र मगदूम यांना तातडीने संपर्क केला. “केवळ एनसी नको, तर संशयितांवर कठोर कलमान्वये एफआयआर दाखल करा,” असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेविका संध्या तेरसे, चांदणी कांबळी, श्रुती वर्दम, अक्षता खटावकर, नगरसेवक अभी गावडे, विलास कुडाळकर, निलेश परब तसेच काका कुडाळकर, संजय पडते, राकेश कांदे, राजवीर पाटील, गणेश भोगटे, बाबा परब आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!