ग्रामस्थ, लोकप्रतिनिधींसह वीज ग्राहक संघटनेच्या पाठपुराव्याने यंत्रणा लागली कामाला
कणकवलीवरून वीजपुरवठा सुरू; नवीन ट्रान्सफॉर्मर व पोल उभारले
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील आंब्रड पंचक्रोशीतील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महावितरणाच्या विविध समस्यांवर अखेर तोडगा निघू लागला असून, विभागीय भाजप पदाधिकारी व सरपंच तसेच वीज ग्राहक संघटना यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महावितरण यंत्रणा कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
गुरुवार, २८ मे २०२६ पासून आंब्रड विभागाला कणकवली महावितरण विभागामार्फत विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला आहे. यासोबतच दोन नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले असून, अत्यावश्यक ठिकाणी आठ नवीन वीज खांब उभारण्यात आले आहेत. तसेच पावसाळा व वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर विद्युत वाहिन्यांवरील झाडांच्या फांद्यांची साफसफाईही करण्यात आली आहे.
२५ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) कुडाळ विभागीय कार्यालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध गावांमधील पावसाळ्यापूर्वी निर्माण होणाऱ्या वीज समस्या व रखडलेल्या कामांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना विविध समस्यांबाबत धारेवर धरले होते. गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामीण तसेच शहरी भागात विजेचा मोठा खेखंडोबा सुरू होता. कोणतीही पूर्वसूचना न देता होणारे भारनियमन, लो-व्होल्टेज वीज पुरवठा, जुन्या वीज वाहिन्या यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. अनेकदा तक्रारी करूनही स्थानिक पातळीवर महावितरण प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्याची नाराजी लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली होती.
महावितरणचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांच्यासमोर लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी विभागातील समस्यांचा पाढाच वाचला होता. यावेळी नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने देण्यात आला होता. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारून तातडीने समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. भाजपचे केशव उर्फ आबा मुंज, पांडुरंग दळवी, स्वप्नील मुंज तसेच सरपंच सौ. मानसी कदम यांनी आंब्रड पंचक्रोशीतील विद्युत समस्यांबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागण्यांची दखल घेत महावितरण विभागाने आवश्यक उपाययोजना राबविल्या आहेत.
या कामांमुळे अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या विद्युत पुरवठ्याच्या समस्यांचे निवारण होऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.









