ठळक घडामोडी

वैभव नाईकांनी हिंमत असेल तर १० वर्षांच्या कामाची ‘श्वेतपत्रिका’ काढावी!

शिवसेना जिल्हा सरचिटणीस तथा जि.प. उपाध्यक्ष दादा साईल यांचे खुले आव्हान

कुडाळ : प्रतिनिधी
       कुडाळ-मालवण मतदारसंघाचे गेली १० वर्षे प्रतिनिधित्व करणाऱ्या वैभव नाईक यांनी आपल्या कार्यकाळात विकासाऐवजी केवळ कंत्राटदार आणि आप्तस्वकीयांचे खिसे भरण्याचे काम केले. राणे साहेबांनी फेकलेल्या तुकड्यांवर पोसले जाणाऱ्यांनी आम्हाला सल्ले देण्याची गरज नाही. तुमच्या याच निष्क्रियतेमुळे जनतेने तुम्हाला घरी बसवले आहे,अशा शब्दांत शिवसेनेचे जिल्हा सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दादा साईल यांनी माजी आमदार वैभव नाईक यांचा समाचार घेतला.
          भाजप पदाधिकारी लॉरेन्स मान्येकर हे हिंदू विरोधी काम करत असल्याचा आरोप आ.निलेश राणे यांनी केला आहे. वैभव नाईक यांनी सोशल मीडियावर निलेश राणे यांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर कुडाळ येथील एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत दादा साईल बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर, दीपलक्ष्मी पडते, रूपेश कानडे, काका कुडाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
     वैभव नाईक यांनी आ.राणेंवर केलेल्या टिकेचा समाचार घेताना दादा साईल पुढे म्हणाले की, गेल्या आठवड्यापासून आमदार निलेश राणे यांनी विविध विभागांच्या आढावा बैठकांचा धडाका लावला आहे. कृषी, महसूल आणि पाणी टंचाई निवारणासाठी ते मैदानावर उतरून काम करत आहेत. हे पाहून पराभूत मानसिकतेत असलेले वैभव नाईक आता सोशल मीडियाच्या माध्यमातून बिनबुडाचे आरोप करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. १० वर्षात त्यांनी साधी एक आमसभा घेतली नाही, कारण जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याची त्यांची धमक नव्हती.
     प्रशासकीय कामांचा बोजवारा आणि कमिशनबाजी
वैभव नाईक यांच्यावर टीका करताना साईल यांनी काही गंभीर मुद्दे उपस्थित केले,नाईक यांनी आपल्या कार्यकाळात केवळ कमिशन मिळवण्यासाठी विकासकामांचे नियोजन केले. त्यांच्या ‘बाबा भालचंद्र कन्स्ट्रक्शन’च्या माध्यमातून झालेल्या कामांची चौकशी झाल्यास मोठे सत्य बाहेर येईल.कुडाळ एसटी स्टँडचा त्यांनी केलेला विकास हा सदोष कामाचा नमुना आहे. आज प्रवाशांना तिथे उभे राहायला जागा नाही. आता आमदार निलेश राणे यांनी या कामासाठी ३ कोटी रुपये मंजूर केले आहेत.उद्धव ठाकरेंची शिवसेना आज बाळासाहेबांचे ज्वलंत हिंदुत्व विसरली आहे. कुडाळमध्ये काँग्रेसच्या मदतीने हिंदूविरोधी नगरसेवकाला नगराध्यक्ष बसवून नाईक यांनी जनतेशी प्रतारणा केली असल्याचे सांगितले.
श्वेतपत्रिका काढण्याचे आव्हान
       गेल्या १० वर्षांत किती निधी आणला आणि त्यातून कोणती कामे पूर्ण झाली, याची हिंमत असेल तर वैभव नाईक यांनी श्वेतपत्रिका जाहीर करावी. आमदार निलेश राणे यांनी एका वर्षात हजारो कोटींची कामे मंजूर करून घेतली आहेत. सोनवडे घाट असो वा नाट्यगृह, प्रलंबित प्रश्न आता मार्गी लागत आहेत,असा दावाही साईल यांनी केला.वैभव नाईक यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. लोकांशी संपर्क नसणे आणि केवळ विरोधाला विरोध करणे यामुळेच त्यांचा पराभव झाला आहे. निलेश राणे यांच्या प्रत्येक कृतीवर बोलण्यापेक्षा नाईक यांनी आपल्या १० वर्षांच्या अपयशाचे उत्तर द्यावे, असे आव्हान श्री.साईल यांनी यावेळी दिले.

error: Content is protected !!