ठळक घडामोडी

टोल आंदोलनावरून वैभव नाईकांचा आ. राणेंवर जोरदार पलटवार!

“ठेकेदाराने वाढदिवसाला जाहिराती दिल्यावर आंदोलन गुंडाळले”; नाईकांचा आरोप

जनतेसाठी लढा सुरूच ठेवणार – वैभव नाईक

कुडाळ : प्रतिनिधी
      माझ्यावर टीका करणाऱ्या आ.निलेश राणेंनी त्यावेळी केलेले हातीवले टोलनाक्याचे आंदोलन ठेकेदाराने वाढदिवसाला जाहिराती दिल्यानंतर गुंडाळले हे जनता विसरली नाही, असा पलटवार शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणेंवर केला.
       ओसरगाव टोल मुद्द्यावर वैभव नाईकांच्या टिकेला आ.निलेश राणेंनी नाईकांवर हल्लाबोल केला होता. त्यावर नाईकांनी आ.राणेंवर पलटवार केला आहे. नाईक म्हणाले, आमदार निलेश राणेंनी माझ्यावर जे आरोप केलेत, त्याच्यापेक्षा जेव्हा 2023 मध्ये जेव्हा हातीवले येथे टोल सुरू झाला होता, तो टोल बंद करण्यासाठी आ.राणेंनीच आंदोलनाची भूमिका घेतली होती. मात्र त्यानंतर ज्याला टोलचा ठेका मिळाला, त्या ठेकेदाराने त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीराती दिल्या, त्यानंतर त्यांचे आंदोलन शांत झाले. हे सर्वांना माहीत आहे. पण आ.निलेश राणे हे जाणत नसतील तर त्यांनी मी ते जाहिरातीचे फोटो पाठवेन. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) किंवा मी जी आंदोलने करतो ती सर्वसामान्य लोकांसाठी असतात. काजू, आंबा नुकसान भरपाईच्या मागणीचे आंदोलन असो, एलईडी मासेमारीविरोधातील आंदोलन असो, किंवा मुंबई गोवा महामार्ग दुरूस्तीचे आंदोलन असो अशी सर्व आंदोलने जनतेसाठीच होती. परंतू आम्ही करीत असलेल्या जनहीताच्या आंदोलनातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे काम आ.निलेश राणे आणि त्यांचे सहकारी करतात. तुम्ही कितीही गुन्हे दाखल करा, पण जे चुकीचे आहे त्याविरोधात आम्ही आवाज उठविणारच आहोत, असेही वैभव नाईक यांनी ठणकावून सांगितले.
      नाईक पुढे म्हणाले, याच प्रकारे आम्ही जनतेला घेऊनच लोकांच्या प्रश्नांसाठी लढणार आहोत. आमच्या आंदोलनाला यश मिळतच आहे. आमच्यावर कोण आरोप करतो, यापेक्षा आंदोलने तडीस लावण्याचा आम्ही प्रयत्न करीत असतो. याउलट आ.राणेंनी नगरपालिका निवडणुकीवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केले होते, त्यांच्याविरोधात भाषणे केली होती, परंतू निवडणूक झाल्यानंतर रविंद्र चव्हाण यांना पुष्पगुच्छ घेऊन जात यांच्यासमोर कसे हात टेकले, हे संपूर्ण राज्याचे पाहिले आहे. त्यामुळे वैभव नाईक जी आंदोलने करतात, किंवा जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवतात, त्याबाबत परिणामांची कोणतीही भिती बाळगत नाहीत. आ.राणेंनी रविंद्र चव्हाण यांच्या प्रकरणातून दाखवून दिलेय कि त्यांच्या आंदोलनात धमक नाही किंवा विरोध करण्याची देखील तुमची धमक नाहीय. त्यामुळे आ.राणेंनी माझ्यावर आरोप करण्यापेक्षा स्वतः जी आंदोलने केलीत किंवा ज्यांच्यावर स्वतः आरोप केलेत, त्याचे पुढे काय झाले याचा शांतपणे विचार करावा आणि मगच माझ्यावर आरोप करावेत, असा सल्ला माजी आमदार वैभव नाईक यांनी आ.राणेंना दिला.

error: Content is protected !!