तिलारी नदीकाठच्या गावांवर प्रशासनाची नजर; पूरस्थिती टाळण्यासाठी आगाऊ नियोजन
आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रशासन सज्ज; नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर
दोडामार्ग : प्रतिनिधी
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने संभाव्य नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन पूरस्थिती, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करावयाच्या उपाययोजना तसेच विविध विभागांतील समन्वय यावर चर्चा करण्यात आली.
तिलारी नदीकाठच्या गावांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पुरस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने संवेदनशील भागांचा आढावा घेतला. मागील वर्षी पुराचा फटका बसलेल्या घरांची तसेच पाणीपुरवठा योजनांवर झालेल्या परिणामांची माहिती घेऊन यंदा अशा समस्या टाळण्यासाठी आगाऊ नियोजन करण्यावर भर देण्यात आला. संबंधित विभागांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन तातडीने प्रतिबंधात्मक कामे पूर्ण करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
नागरिकांच्या अडचणींवर त्वरित कार्यवाही व्हावी यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी आपले मोबाईल सुरू ठेवून सतर्क राहावे, असे निर्देश प्रशासनाने दिले. तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाच्या ७५५८६७३४६८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. तहसीलदार राहुल गुरव यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज असून विविध विभागांमध्ये समन्वय राखून प्रभावी उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यासाठी सोमवारी सर्व विभाग प्रमुखांची विशेष बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या बैठकीस पंचायत समिती सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस, जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस, साक्षी तळवडेकर, श्वेता धर्णे, गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत, तालुका कृषी अधिकारी सौरभ कदम, पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर, सायली निंबाळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, सरपंच आणि पोलिस पाटील उपस्थित होते.









