ठळक घडामोडी

“राणेंचे हिंदुत्व व मराठी बाणा आजही तसाच”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार!

कणकवलीत खा.नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळा दिमाखात

दिग्गजांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम; केंद्रीय मंत्री गडकरी, खा. तटकरे, श्री.सामंत यांच्याकडूनही राणेंच्या कार्याचा गौरव

कणकवली : खा.नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण सोहळ्यातील विविध क्षण. (सर्व छायाचित्रे – अनिकेत उचले, कणकवली)

कणकवली : अनिकेत उचले
      शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीत घडलेले खासदार नारायण राणे यांनी हिंदुत्व आणि मराठी बाणा आजपर्यंत जपला आहे. कोकणाच्या विकासाला दिशा देणारे नेतृत्व म्हणून राणेंची ओळख असून ते ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. राणे शतायुषी होवोत आणि त्यांच्या शताब्दी वाढदिवसानिमित्त पुन्हा याच मैदानावर जमू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
      कणकवलीतील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर आयोजित खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवस व अमृत महोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, उदय सामंत, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, खासदार सुनील तटकरे, आमदार दीपक केसरकर, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
     श्री.फडणवीस म्हणाले, “नारायण राणे यांच्या यशात नीलम राणे यांचा मोठा वाटा आहे. नितेश व निलेश राणे यांनी हा राजकीय वारसा समर्थपणे पुढे नेला आहे. हजारो लोकांचे जीवन बदलण्याचे कार्य राणेंनी केले असून मुंबईत मराठी माणसांना घरे मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.” विधिमंडळातील आपल्या सुरुवातीच्या काळातील आठवणी सांगताना त्यांनी राणे व गोपीनाथ मुंडे यांच्या सहवासातून संसदीय कामकाजाचे धडे मिळाल्याचे सांगितले.
        केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राणेंच्या राजकीय प्रवासाचा गौरव करताना, “राज्यातील प्रभावी विरोधी पक्षनेते म्हणून राणेंनी ठसा उमटवला. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळाली,” असे नमूद केले. तरुण आमदारांनी राणेंच्या कार्यशैलीचा अभ्यास करावा, असेही त्यांनी सांगितले.
      मंत्री उदय सामंत यांनी राणेंच्या नेतृत्वातील किस्से सांगत त्यांच्या ठाम भूमिकेचे उदाहरण मांडले. सुनील तटकरे यांनी राणेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाचा उल्लेख करत, अधिक काळ संधी मिळाली असती तर राज्याचा कायापालट झाला असता, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमात राणे यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते नारायण राणे यांचा सहपत्नीक शाल, श्रीफळ, गणेशमूर्ती व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
      *राणे मनाने काँग्रेसमध्ये गेले नाहीत*
शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणे हे मनाने काँग्रेसमध्ये गेले नव्हते. परिस्थितीमुळे त्यांनी तो निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. तसेच राणे व गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनामुळेच संसदीय यश मिळाल्याची कबुलीही त्यांनी दिली.
     *मेअखेरपर्यंत मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण : गडकरी*
      मे महिन्याअखेरपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल. पावसाळ्यापासून प्रवास अधिक सुखकर होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!