माजी आमदार वैभव नाईक यांची टीका; टोल सुरू करण्यास ठाकरे शिवसेनेचा विरोध
१२ वर्षे उलटूनही काम अपूर्ण; मग टोल का? नाईकांचा सत्ताधाऱ्यांवर सवाल
कणकवली : प्रतिनिधी
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी सिंधुदुर्गवासीयांना टोलची भेट दिली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण्याचे काम १२ वर्ष उलटले तरी पूर्ण झालेले नाही. जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोल वसुली केली जाऊ नये. ओसरगाव येथे टोल वसुली करण्यास ठाकरे शिवसेनेचा विरोध असून टोल वसुलीला व्यापा-यांसह सिंधुदुर्गवासीयांना तीव्र विरोध करावा, असे आवाहन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले.
कणकवली येथील विजयभवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत वैभव नाईक बोलत होते. श्री.नाईक म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्यापही अपूर्णावस्थेत आहे. १२ वर्षे उलटली तरीही महामार्गाचे काम पूर्ण झाले नाही. मंत्री नितीन गडकरी हे काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग दौ-यावर आले असताना एका कार्यक्रमात त्यांनी मे महिन्याच्या अखेरीस महामार्गाचे काम पूर्ण होईल. मात्र, प्रत्यक्षात महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोकणवासीयांकडून टोल वसुली करू नये, अशी ठाकरे शिवसेनेची मागणी आहे. महामार्ग करण्यासाठी १२ वर्षे का लागतात? ओरसगाव येथे टोल वसुली सुरू झाली तर ठाकरे शिवसेना आंदोलन करेलच, पण टोलविरोधात जनतेने उठाव केला पाहिजे. सत्ताधारी टोल वसुलीमध्ये गुंतलेले आहेत. टोलवसुलीसाठी सत्ताधारी पोलीस बळाचा वापर करतील. टोल वसुलीची निविदा होऊ नये यासाठी जनतेने आवाज उठवला पाहिजे. ओसरगाव येथील टोल सुरू करण्यासाठी गेले आठ दिवस कंपनी सर्वे करीत आहे. टोलसाठी मंत्री गडकरी कोणाच्या जवळ आहेत, याचा विचार जनतेने केला पाहिजे. टोलविरोधात व्यापारी संघाने पुढाकार घ्यावा. त्यांना आमचा पाठिंबा आहे. टोल विरोधात सत्तेतील पक्ष भूमिका घेत असतील तर त्यांना आमचा पाठिंबा असेल, असे वैभव नाईक यांनी सांगितले.







