ठळक घडामोडी

देवगडात वडीलांच्या गाडीखाली सापडून चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू!

देवगड : प्रतिनिधी
    देवगड तालुक्यातील तळवडे परबवाडी येथे वडील चालवत असलेल्या बोलेरो पिकअप गाडीच्या मागील चाकाखाली सापडून झालेल्या अपघातात चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यु झाला. ही घटना रविवारी दुपारी ३.३० वा.सुमारास घडली.या घटनेमुळे देवगड तालुक्यात हळहळ होत आहे दरम्यान या घटनेची नोंद देवगड पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.
    उपलब्ध माहितीनुसार, वडिलांनी भाड्याची गाडी घरी आणली होती. ती गाडी देण्यासाठी रविवारी दुपारी ३.३० वा.सुमारास ते आपल्या घराकडून निघाले होते.यावेळी त्यांचा गाडीतील क्लिनर सीटवर त्यांची छोटी मुलगी बसली होती. नंतर ती गाडीतून उतरून ती घरी गेल्याचे तिच्या वडिलांना वाटल्याने त्यांनी गाडी सुरू करून पुढे जात असताना गाडीच्या क्लीनर साईडच्या पाठीमागील चाकाचा धक्का तिला बसला. या घटनेत तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. ही घटना लक्षात येताच नातेवाईकांनी ग्रामस्थांच्या मदतीने तिला तात्काळ देवगड येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले. तेथून तिला देवगड ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले.परंतू उपचार सुरू करण्यापुर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची नोंद देवगड पोलिस स्थानकात करण्यात आली.सहाय्यक पोलिस निरिक्षक सुप्रिया बंगडे, महिला पोलिस हवालदार विनीता भुजे, पोलिस हवालदार गणपती गावडे यांनी देवगड ग्रामीण रूग्णालयात भेट देवून घटनेची माहिती घेतली व पंचनामा केला. देवगड ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून सायंकाळी उशिरा मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला.या घटनेचा तपास पोलिस हवालदार आशिष कदम करीत आहेत.
     आपल्या चिमुकलीचा अपघाती मृत्युने तिच्या आई-वडीलांनी देवगड ग्रामीण रूग्णालयात केलेला आक्रोश उपस्थितांचे ह्दय पिळवटून टाकणारा होता.या अपघाताचे वृत्त तळवडे गावात समजताच गावातील नागरिकांनी देवगड ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली होती.

error: Content is protected !!