मटण-भाकरीच्या प्रसादासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा
दर्शनासाठी भाविकांची गर्दी; परराज्यातील भाविकांचीही उपस्थिती

नांदगाव : प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्रासह परराज्यातही मोठा भक्तवर्ग असलेला आणि मटण भाकरीच्या प्रसादाने वेगळी ओळख असलेली जत्रा म्हणून ओळखली जाणारी भक्तांच्या हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा नांदगाव येथील श्री देव कोळंबाची जत्रा रविवारी मोठ्या उत्साहात व भक्तांच्या अलोट गर्दीने संपन्न झाली. यावेळेस कोळंबाच्या जयघोषाने अवघी नांदगाव नगरी दुमदुमली. यावर्षी श्रीदेव कोळंबा देवाच्या जत्रेला भाविकांची अलोट गर्दी उसळली होती.सकाळ सत्रात नवस फेडण्यासाठी कोंबडी,बकरा घेऊन तर सायंकाळी मटण भाकरीच्या महाप्रसादाला भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.यामुळे नांदगाव श्रीदेव कोळंबा परीसर भक्तीसागरात न्हावून गेला होता. त्याचबरोबर कोंबडे व बकरे विक्रीसह अन्य व्यावसायिक दाखल झाले होते.
जिल्ह्यातील जत्रेंमध्ये वेगळी ओळख असलेली
महाराष्ट्र,गोवा व इतर राज्यात प्रसिध्द असणारी श्री देव कोळंबाचा जत्रौत्सव रविवारी सकाळीच जत्रोत्सवानिमित्त भाविकांनी नवस फोडण्यास सुरवात केल्यानंतर सायंकाळ नविन नवस बोलणे तसेच जत्रेचे वेगळेपण असणारे मटण व भाकरीच्या प्रसादासाठी भाविकाची झुंबड उडत आलेल्या असंख्य भाविकांनी श्रीदेव कोळंबाचे मनोभावे दर्शन घेतले. तत्पूर्वी रविवारी सकाळी मानकरी ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री देव कोळंबाची विधिवत पूजाअर्चा झाल्यानंतर या यात्रोत्सवास प्रारंभ झाला. यात्रोत्सवासाठी भाविकांची सकाळपासून आगमन होत होते. सकाळच्या सुमारास यात्रा परिसर नवस फेडण्यासाठी श्रीफळासह कोंबडी, बकरे घेऊन भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.
दुपारच्या वाढत्या उन्हाबरोबरच गर्दी वाढू लागल्याने दर्शनाची रांगही लांबलचक झाली होती. यानंतर नवीन नवस बोलण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. यावर्षी कोळंबा यात्रेसाठी जिल्ह्यातील भक्तांबरोबर मुंबईकर चाकरमानी, विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते, पदाधिकारी, पर्यटक, इतर राज्यातील भाविकांनी हजेरी लावत कोळंबा यात्रेसाठी एकच गर्दी केली होती.यात्रोत्सवास येणा-या भाविकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय जाणवू नये यासाठी श्री देव कोळंबा देवस्थानचे अध्यक्ष नागेश मोरये,सहकारी व नांदगाव दशक्रोशीतील ग्रामस्थांनी यात्रेचे परिपूर्ण नियोजन केले होते.यावेळी वाहनासाठी पार्किंग व्यवस्था, दर्शनासाठी रांगेची व्यवस्था, विविध वस्तू व खाद्याची दुकाने,आरोग्य केंद्राचे पथक, स्वयंसेवक यामुळे यात्रेमध्ये सुरळीपणा जाणवत होता. यात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक मंडप व विद्युत रोषणाई करून मंदिर परिसर झळाळून निघत भक्तांचा जनसागर ऊसळला होता.









