शिवरायांची युद्धनीती व आरमार उभारणीवर मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी
इतिहास संकलन समिती व शिवप्रेमी संघटनेचा उपक्रम
कुडाळ : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनशैली आणि त्यांचे युद्धकौशल्य आजच्या पिढीने आत्मसात करावे, या उद्देशाने इतिहास संकलन समिती व शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘इतिहास कट्टा’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत येत्या ९ मे रोजी सकाळी पावशी (ता. कुडाळ) येथील शांतादुर्गा मंगल कार्यालयात थोर इतिहास अभ्यासक रविराज पराडकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती समितीचे जिल्हा कार्यवाह डॉ. कमलेश चव्हाण व विवेक पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुडाळ एमआयडीसी येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. चव्हाण बोलत होते. यावेळी रमाकांत नाईक व बंड्या सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. चव्हाण म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवरायांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी विविध ठिकाणी व्याख्याने आयोजित केली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून ९ मे रोजी पावशी येथे व्याख्यान होईल. महाराजांनी शून्यातून स्वराज्य कसे निर्माण केले आणि त्यांची जीवनशैली कशी होती, हे सर्वांना कळावे हा यामागचा मुख्य हेतू आहे. विवेक पंडित यांनी सांगितले की, या व्याख्यानाचा मुख्य विषय ‘शिवाजी महाराजांची युद्धनीती आणि आरमार दल निर्मिती’ असा आहे. शिवरायांनी भौगोलिक परिस्थितीचा विचार करून आरमार दलाची उभारणी कशी केली, यावर रविराज पराडकर सखोल मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे, व्याख्यानानंतर श्रोत्यांसाठी प्रश्नोत्तरांचे सत्रही होणार आहे. तरी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन इतिहास संकलन समिती व शिवप्रेमी सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आले आहे.









