अनेक ठिकाणी झाडे कोसळली; मोठे नुकसान
कुडाळ, वेंगुर्लेतही पाऊस; आंबा-काजू पिकांना फटका बसण्याची भीती
सावंतवाडी/कुडाळ/वेंगुर्ले : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्यात गुरूवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सावंतवाडी नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात गुरुवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शहरात मोठा तडाखा दिला. या वादळामुळे शहरातील तब्बल २२ ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या. तसेच एस. पी. के. कॉलेज परिसरातील पत्र्याचे शेडही जोरदार वाऱ्यामुळे कोसळले.
नगर परिषद व संबंधित यंत्रणांनी तात्काळ हालचाल करत सर्व पडलेली झाडे हटवली असून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. एका घरावर झाडाचा काही भाग पडला असला तरी मोठे नुकसान झालेले नाही. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, तहसील कार्यालय सावंतवाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २३ एप्रिल) संध्याकाळपासून रात्रीपर्यंत तालुक्यातील शिरशिंगे, आंबेगाव, पाडलोस, कलंबिस्त, वेर्ले, सातूळी, रोणापाल, तिरोडा, मडुरा, इन्सुली, आजगाव आदी भागांत पावसाने हजेरी लावली. कलंबिस्त येथील गणशेळवाडीमध्ये रवींद्र गजानन तावडे यांच्या घराच्या अंगणातील पत्र्यावर फणसाचे झाड कोसळून काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
तहसील कार्यालय कुडाळ यांच्या माहितीनुसार, कुडाळ तालुक्यातील नेरूर, कर्याद, नारूर, चाफेली व गोठोस येथेही पावसाची नोंद झाली आहे. तसेच वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे, मातोंड, शिरोडा व म्हापण या भागांमध्येही पावसाचा शिडकावा झाला. या अवकाळी पावसामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर ऐन हंगामात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कोकणातील आंबा, काजू, कोकमसह अन्य पिकांना मोठा फटका बसण्याची भिती व्यक्त होत असून, यामुळे शेतकरी बागायतदार हवालदिल झाले आहेत.






