ठळक घडामोडी

आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्यात विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन!

नेरूरला जलशुद्धीकरण प्रकल्प लोकार्पण; वालावल-पाट तलाव सुशोभीकरण कामांना प्रारंभ

आवळेगाव-निवजे-आंबेरी पुलाचे लोकार्पण; ग्रामीण वाहतुकीला नवी चालना

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिंदे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यात मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा बुधवारी त्यांच्या उपस्थितीत पार पडला.
      नेरूर कलेश्वर मंदिर परिसरात जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण!
      नेरूर येथील श्री कलेश्वर मंदिर परिसरात ग्रामस्थांच्या हिताचा महत्त्वपूर्ण असा जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना स्वच्छ, शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून ग्रामविकासाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.उपस्थित मान्यवरांनी या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी अशा विकासकामांची आवश्यकता असून भविष्यातही जनतेच्या हितासाठी विविध विकास प्रकल्प राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. ग्रामस्थांनी देखील या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले. धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्व असलेल्या श्री कलेश्वर मंदिर परिसरात उभारण्यात आलेला हा प्रकल्प नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे.
      वालावल श्री लक्ष्मीनारायण मंदिर परिसरातील तलावाचे होणार सुशोभीकरण
       निसर्गरम्य वालावल गावामधील श्री लक्ष्मी नारायण मंदिर परिसरात होणाऱ्या तलाव सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. गावाच्या सौंदर्यात भर घालणारा तसेच पर्यटन आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारा हा विकास प्रकल्प भविष्यात वालावलच्या ओळखीला नवी दिशा देणारा ठरणार आहे.
या सुशोभीकरणामुळे मंदिर परिसर अधिक आकर्षक, स्वच्छ आणि पर्यटकांसाठी सुविधायुक्त होणार असून स्थानिक ग्रामस्थांनाही याचा मोठा लाभ मिळणार आहे. पारंपरिक वारसा आणि आधुनिक विकास यांचा सुंदर संगम साधण्याचा हा प्रयत्न असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.वालावल गावाच्या विकासासाठी आणि धार्मिक स्थळांच्या संवर्धनासाठी अशा प्रकारची कामे भविष्यातही सातत्याने सुरू राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
        पाट तलावाचे होणार सुशोभीकरण!
     पाट येथील तलाव सुशोभीकरण या महत्त्वपूर्ण विकासकामाचे भूमिपूजन संपन्न झाले. ग्रामविकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या कामामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच स्थानिक नागरिकांना आणि भाविकांना एक आकर्षक व स्वच्छ परिसर उपलब्ध होणार आहे. तलाव परिसर हा गावाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा केंद्रबिंदू असतो. या सुशोभीकरण प्रकल्पामुळे पर्यावरण संवर्धन, पर्यटन वाढ तसेच ग्रामस्थांसाठी विरंगुळ्याचे सुंदर ठिकाण निर्माण होण्यास मदत होणार आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार निलेश राणे सातत्याने प्रयत्नशील असून विविध विकासकामांद्वारे कुडाळ तालुक्याच्या प्रगतीला नवी दिशा देत आहेत असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.उपस्थित मान्यवरांनी या विकासकामाबद्दल समाधान व्यक्त करत गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. ग्रामस्थांनीही या कामाबद्दल आनंद व्यक्त करत आमदार निलेश राणे यांचे आभार मानले.
      आवळेगाव, हिर्लोक, निवजे आणि आंबेरी गाव जोडणाऱ्या पुलाचे लोकार्पण!
       कुडाळ तालुक्यातील आवळेगाव, हिर्लोक, निवजे आणि आंबेरी या गावांना जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण रस्त्यावरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. या पुलामुळे परिसरातील नागरिकांची वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेगवान होणार असून अनेक वर्षांपासूनची ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाली आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी दर्जेदार रस्ते आणि मजबूत पूल हे अत्यंत आवश्यक घटक मानले जातात. या नव्या पुलामुळे शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः पावसाळ्यात वाहतुकीस निर्माण होणाऱ्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होऊन गावांमधील संपर्क अधिक मजबूत होणार आहे. विकासाच्या दिशेने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल म्हणून या कामाकडे पाहिले जात आहे.उपस्थित मान्यवरांनी पुलाच्या कामासाठी संबंधित विभागाचे अभिनंदन करत भविष्यातही ग्रामीण भागातील विकासकामांना प्राधान्य देण्याचा विश्वास व्यक्त केला. ग्रामस्थांनीही या लोकार्पण सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त करत सर्व मान्यवरांचे आभार मानले.
      यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जि.प.चे माजी अध्यक्ष काका कुडाळकर व संजय पडते, जिल्हा परिषद सदस्य नागेश आईर, रूपेश कानडे व आरती पाटील, कुडाळ पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नारकर व विनायक राणे, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, नेरूर सरपंच भक्ती घाडी, माजी सरपंच चारूदत्त देसाई, समद मुजावर, माजी पं.स. सदस्य संदेश नाईक, वालावल सरपंच राजा प्रभू, दयानंद चौधरी आदींसह शिवसेना व महायुतीचे पदाधिकारी – कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!