ठळक घडामोडी

कुडाळमध्ये नदीपात्रात बुडून २२ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू!

मित्रांसोबत पोहायला गेला असता घडली दुर्घटना

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ शहरातील कविलकाटे परिसरातील भंगसाळ (कर्ली) नदीपात्रात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या वैभव नितीन बांदेकर (वय २२, रा.कुडाळ) या युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी वैभवसह चार युवक भंगसाळ नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. चौघेही तरुण नदीपात्रात उतरले असता, त्यातील दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरून ते बुडू लागले. ही परिस्थिती पाहून उपस्थित मित्रांनी आरडाओरडा करत तातडीने मदतीसाठी धाव घेतली. यामध्ये एका मित्राला वाचवण्यात यश आले, मात्र वैभव खोल पाण्यात गेल्याने तो पाण्यात बुडाला.
     ही घटना वाऱ्यासारखी शहरात पसरताच स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी तातडीने नदीकाठी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने बुडालेल्या शोध घेण्यात आला असता, त्याचा मृतदेह सापडला. कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. वैभव येथील महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकत होता. वैभवच्या निधनाने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून, कुडाळ शहर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!