कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांचे यंत्रणांना निर्देश
न.पं.त मान्सूनपूर्व आढावा बैठक; नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांकडून तयारीचा आढावा
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ नगरपंचायतीत मंगळवारी (२८ एप्रिल) सायंकाळी झालेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर व उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी सर्व यंत्रणांकडून मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या. पावसाळ्यासाठी सर्व यंत्रणांनी सर्व तयारीनीशी सज्ज रहावे. पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व संबंधित यंत्रणांनी २४ तास अलर्ट रहावे, अशा सूचना नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर यांनी यावेळी संबंधित प्रशासकीय यंत्रणांना दिल्या.
आरोग्य विभागाने पावसाळ्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार केला असून, पुरबाधित भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. औषधसाठा मुबलक उपलब्ध ठेवण्यात आला असल्याचे यावेळी आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. जलजन्य आजार टाळण्यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी आरोग्य प्रशासनाला देण्यात आल्या. नगरपंचायतीच्या अखत्यारितील रस्त्यांची कामे पूर्णत्वाकडे आली असली तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले. सा.बां.च्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासह, बुजलेली गटारे त्वरित साफ करून पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत करावा, तसेच नाबरवाडी रेल्वे ब्रिज परिसरातील समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना नगराध्यक्षांनी सा.बां.विभागाला दिल्या.
महावितरण विभागाला धोकादायक वीज पोल व वाहिन्यांची दुरुस्ती, झाडांची छाटणी आणि पावसाळ्यापूर्वी सर्व वीज समस्या सोडवण्याचे निर्देश देण्यात आले. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी,अशी सूचना करण्यात आली. पावसाळ्यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहीती देण्यात आली. पोलिसांकडे असलेली आपत्कालीन बोट नादुरुस्त असल्याने दुरुस्तीबाबतही पाठपुरावा सुरू असल्याची माहिती देण्यात आली. ग्रामीण रुग्णालय, पशुवैद्यकीय विभाग, अग्निशमन दल, याबाबतही आढावा घेत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीस मुख्याधिकारी विनायक औंधकर, नगरसेविका अक्षता खटावकर, ज्योती जळवी, नयना मांजरेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यावर भर देण्यात आला.






