ठळक घडामोडी

अपूर्ण महामार्गावर टोल ‘भेट’; मनसेची उपरोधिक टीका!

“फसवी आश्वासने, टोलची धाड” – कुणाल किनळेकरांचा सरकारवर हल्लाबोल

टोल नेमका कोणाच्या फायद्यासाठी? – किनळेकर

कुडाळ : प्रतिनिधी
     सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच एका कार्यक्रमानिमित्त येऊन गेलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई – गोवा महामार्गाबाबतच्या फसव्या आश्वासनासह सिंधुदुर्ग जिल्ह्याला टोल भेट दिली.  मुंबई गोवा महामार्गाचे काम अद्याप अपूर्णच आहे मात्र सरकार टोलच्या धाडीसाठी तत्पर आहे, अशी उपरोधिक टिका मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.
     कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, गेल्या अनेक वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासाच्या नावाखाली दिवा स्वप्नेच दाखवण्याचे काम सुरू आहे. यामध्ये एखाद्या प्रकल्पामार्फत सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना फायदा अथवा रोजगार उपलब्ध झालेला नाही. यामध्ये विमानतळाचा प्रकल्प, मायनिंगचे प्रकल्प व कुडाळ एमआयडीसी या सारखे अनेक प्रकल्प, प्रत्येक वेळी जनतेच्या तोंडाला पाणीच पुसण्याचे काम सुरू आहे. यामध्ये भर म्हणून नुकतेच जिल्ह्यात आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा महामार्ग मे महिन्यात पूर्ण करण्याचे पुन्हा एकदा फसवे आश्वासन दिले. सिंधुदुर्ग मध्ये येऊन मालवणी आस्वाद घेत दिल्लीला गेल्यावर मात्र सिंधुदुर्गच्या जनतेला टोल धाडीची भेटवस्तू पाठवून देण्याचे काम मात्र अति तत्परतेने केले. गेल्या काही वर्षापासून रखडलेला मुंबई गोवा महामार्ग येत्या मे महिन्यात पूर्ण होण्याची सुताराम देखील शक्यता नसताना ही टोल धाड नेमकी कोणाच्या फायद्यासाठी आहे, हे खासदार नारायण राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे व आमदार दीपक केसरकर यांनी जाहीर करावे असे आवाहन मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!