ठळक घडामोडी

महिला अधिकारी असूनही पोलिसांनी वेळेत तक्रार घेतली नाही….!

शिरगाव आरोग्य केंद्रातील हल्ल्याप्रकरणी पोलिसांवर संताप

जि. प. आरोग्य समिती सभेत सभापतींसह सत्ताधारी सदस्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
           प्राथमिक आरोग्य केंद्र शिरगाव येथे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर रात्रीच्या वेळी झालेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी पोलीस प्रशासनाने दाखवलेल्या उदासीनतेबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. घटनास्थळी एक महिला अधिकारी उपस्थित असूनही पोलीस यंत्रणेने वेळेत सहकार्य केले नाही आणि तक्रार (एफआयआर) घेण्यास कमालीची दिरंगाई केली, असा गंभीर आरोप सत्ताधारी पक्षाच्या सदस्य असावी डोके यांनी केला, तोच धागा पकडत सभापती प्रितेश राऊळ यांनी पोलिसांची ही वागणूक योग्य नाही हा जिल्हा साठी कलंक आहे असे सांगून पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करत या प्रकरणातील मुख्य आरोपीवर थेट तडीपारीची कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली असल्याचे सांगितले.
            जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची सभा जि. प. सभागृहात सभापती प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी पार पडली. या सभेत शिरगाव येथील घटनेचे तीव्र पडसाद उमटले.शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यावर हल्ला करून गळा दाबण्याचा प्रयत्न केला, तसेच फार्मासिस्ट आणि संदीप साटम यांच्यावर दगडफेक केली. या घटनेनंतर डॉक्टर आणि कर्मचारी पोलीस स्टेशनला गेले तरी उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्यात आला नाही; उलट पोलिसांच्या गाडीची काच फुटलेली असतानाही पोलिसांनी मुख्य आरोपीला त्याच्याच गाडीने रत्नागिरीला पाठवले, अशी धक्कादायक माहिती सभागृहात दिली. सत्ताधारी गटाच्या सदस्या सावी लोके यांनीही पोलिसांच्या या असहकार्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर अत्यंत आक्रमक पवित्रा घेत सभापती प्रितेश राऊळ यांनी पोलिसांच्या या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला. अशा घटना घडत राहिल्या तर ग्रामीण भागात डॉक्टर काम करायला तयार होणार नाहीत, असे सांगत संबंधित मुख्य आरोपीवर तडीपारीची कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
      स्मार्ट एजन्सीवर कारवाईचे आदेश
  जिल्हा रुग्णालयातील ड्रायव्हर आणि सफाई कामगारांना वेळेत पगार मिळत नसल्याचा प्रश्न सदस्य रुपेश पावसकर यांनी उपस्थित केला. त्यावर वैद्यकीय अधीक्षक शिल्पा नारायणकर यांनी ‘स्मार्ट’ कंपनीकडून बिल वेळेत येत नसल्याने पगार देण्यास उशीर होत असल्याचे सांगितले. याची गंभीर दखल घेत सभापतींनी आरोग्य समितीचा रीतसर ठराव करून संबंधित ‘स्मार्ट’ एजन्सीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच जिल्हा रुग्णालय आवारात नव्याने उभारण्यात आलेल्या ‘आयुष’ बिल्डिंगला काही ठिकाणी लिकेज असल्याने इमारत ताब्यात घेण्यापूर्वी प्रत्यक्ष पाहणी करू, असे सभापतींनी स्पष्ट केले. दूर्धर आजारासाठी मिळणारी १५ हजार रुपयांची मदत अत्यंत अत्यल्प असल्याचे रूपेश पावसकर यांनी निदर्शनास आणले.
         नेरुर उपकेंद्र पूर्ण रस्ताच नाही..!
  नेरूर (ता. कुडाळ) येथील उपकेंद्राची इमारत पूर्ण होऊन आठ महिने झाले, तरी तिथे जाण्यासाठी रस्ता नसल्याचे आणि स्थानिक लोक सहकार्य करत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. असाच प्रकार कुणकेश्वर उपकेंद्राबाबतही असून यावर तोडगा काढण्यासाठी येत्या सोमवारी जिल्हा पातळीवर विशेष बैठक घेण्याचे आदेश सभापतींनी दिले. तसेच म्हापण जिल्हा परिषद मतदारसंघात म्हापण व कर्ली ही दोन मंजूर उपकेंद्रे जागेअभावी रखडल्याचे सदस्यांनी स्पष्ट केले. परिचरांच्या बदल्या त्यांच्या अधिकच्या सेवेनुसार कराव्यात, या रुपेश पावसकर यांच्या सूचनेला डॉ. सई धुरी यांनी अनुमती दिली.
       सभेत जिल्ह्यातील रेडी, आचरा आणि आंबोली या तीन पर्यटन स्थळांवर ‘पंचकर्म केंद्र’ सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या मोकळ्या जागेत उत्पन्नवाढीसाठी १७ जागांवर वाणिज्य गाळे उभारण्याबाबत चर्चा झाली. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची (क्वाटर्स) स्थिती भयावह असून या संदर्भातील अहवाल तयार करून निधीसाठी पालकमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला जाईल, असे सांगण्यात आले. जिल्ह्यात ‘जन आरोग्य समिती’ स्थापन झाली असल्याची माहिती डॉ. सई धुरी यांनी दिली.
        मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणाऱ्या सर्व गरोदर मातांना ‘आयडेंटिफाय’ करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील साडेसात हजार परप्रांतीयांचे साथरोगांबाबत सॅम्पल घेण्यात आले असून त्यापैकी अनेक सॅम्पल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात कायमस्वरूपी मेडिकल ऑफिसर्सची संख्या कमी असून सिंधुदर्गाला अधिक पदे मिळावीत यासाठी सचिवांकडे पत्रव्यवहार केल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

error: Content is protected !!