ठाकरे शिवसेनेचे जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर आक्रमक
१ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
कुडाळ : प्रतिनिधी
पिंगुळी येथील ग्रामस्थांची जीवनवाहिनी असलेल्या पाझर तलावाच्या अस्तित्वाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. परिसरातील वाढते अनधिकृत बांधकाम, वृक्षतोड आणि भविष्यात होणारे जलप्रदूषण याविरोधात सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या १ मे (महाराष्ट्र दिन) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
नेमकी समस्या काय?
श्री.सडवेलकर यांनी कुडाळ येथे आज पत्रकार परिषदेत मांडलेल्या मुद्द्यांनुसार, एका कंपनीमार्फत तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प किंवा रेखांकनाचे काम प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे निर्माण होणारे सांडपाणी थेट तलावात सोडले जाण्याची शक्यता असून, यामुळे हजारो ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
प्रशासकीय दिरंगाई आणि बेजबाबदारपणा
पिंगुळी ग्रामपंचायत गेल्या २५-३० वर्षांपासून या तलावाचा वापर करत आहे. सुमारे १५ ते २० हजार लोकसंख्या आणि २,५०० ग्राहक या पाण्यावर अवलंबून आहेत. तलाव लघु पाटबंधारे (जिल्हा परिषद) विभागाच्या अखत्यारीत असताना, त्यांची रीतसर परवानगी न घेताच ग्रामपंचायतीने विकासकाला ना हरकत दाखला दिल्याचा आरोप सडवेलकर यांनी केला आहे. स्वतःच्या जागेत अतिक्रमण होत असताना लघु पाटबंधारे विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली असून, एकेकाळी तिथे असलेली माड आणि काजूची बागायती नष्ट झाली आहे. पावसाळ्यात उत्खननाची माती तलावात साचून साठवण क्षमता कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.काही लोक आर्थिक हितसंबंधांसाठी तक्रारी करत असल्याचा दावा विकासक करत आहेत. जर असे असेल तर लघु पाटबंधारे विभागाने पोलिसांत तक्रार का दिली नाही? जनतेच्या जीवाशी खेळू पाहणाऱ्या या प्रकल्पाविरोधात आम्ही १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असा इशारा श्री.सडवेलकर यांनी दिला आहे.









