माजी आमदार वैभव नाईक यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
निवडणुकीची मोर्चेबांधणी; कुडाळात राजकीय हालचालींना वेग
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ शहरात संघटना बांधणीबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ‘अॅक्शन मोड’वर येत, आगामी रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संघटना बांधणीसह विविध विषयांवर चर्चाविनिमय करण्यात आले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कुडाळ शहराची महत्त्वपूर्ण बैठक माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवारी सायंकाळी कुडाळ येथे पार पडली. यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट, जि.प.सदस्य रुपेश पावसकर, शहरप्रमुख संतोष शिरसाट, युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, सुशील चिंदरकर, बाळा वेंगुर्लेकर, शैलेश काळप, गुरू गडकर, संतोष अडूरकर, भूषण कुडाळकर, सतीश कुडाळकर आदींसह शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत, संघटना मजबूत करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. जनतेच्या समस्या, प्रश्न जाणून घेत, त्या तत्परतेने सोडविण्यावर भर देणे, संघटना वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे, यांसह विविध विषयांवर चर्चा तसेच मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान, आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेने कुडाळ शहरात मोर्चेबांधणी सुरू केली आहे.









