

इंधनासाठी वाहनधारकांची धावाधाव; पर्यटक आणि चाकरमान्यांची गैरसोय
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला असून, गुरुवारी (१४ मे रोजी) काही पेट्रोल पंपांवर “पेट्रोल-डिझेल संपले आहे” अशा पाट्या झळकल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली. इंधन टंचाईमुळे वाहनधारक, पर्यटक तसेच मुंबईकर चाकरमान्यांची धावाधाव सुरू असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्हाभरातच अधून मधून पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या सुट्टीचा हंगाम सुरू असून मोठ्या प्रमाणात पर्यटक तसेच मुंबईकर चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यातच लग्न सराईचाही माहोल सुरू आहे. त्यातच इंधनाचा तुटवडा भासू लागल्याने, याची झळ वाहनधारक तसेच नागरिकांना बसत आहे. गुरूवारी कुडाळमध्ये पेट्रोल-डिझेलचा साठा शाॅर्टेज होत आहे. त्यामुळे काही पेट्रोलपंपांवर पेट्रोल व डिझेल संपल्याच्या पाट्या लावण्यात आल्याने, वाहनधारकांची धावाधाव झाली. उद्या शुक्रवारी इंधनाचे टँकर दाखल होणार असल्याचे संबंधित पेट्रोल पंपांवर सांगण्यात येत होते. तर काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरू असल्याने वाहनधारकांची गर्दी होती.









