कोकणवासियांना टोलमाफी देण्याची माजी आ.वैभव नाईक यांची मागणी
कणकवली : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू होऊन तब्बल १४ वर्षे उलटून गेल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मे २०२६ पर्यंत काम पूर्ण होईल, असे काल आश्वासन दिले असले तरी या विलंबासाठी तेच जबाबदार असल्याचा आरोप कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
श्री.नाईक यांनी प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा वगळता रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत महामार्गाचे काम करणारे अनेक ठेकेदार कामे अर्धवट टाकून निघून गेले, तरी त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे काम श्री.गडकरी यांनी केले. त्यामुळे महामार्गाचे काम रखडले असून कोकणवासीयांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागला आहे.
महामार्गाच्या विलंबाबाबत श्री.गडकरी यांनी जनतेची माफी मागितली असली तरी ही माफी केवळ टोल वसुलीसाठी आहे का?असा सवालही नाईक यांनी उपस्थित केला आहे. अपूर्ण अवस्थेतील महामार्गामुळे झालेल्या अपघातांत हजारो कोकणवासीयांचा जीव गेला असून त्यांच्या कुटुंबीयांना सरकार आर्थिक मदत देणार का?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
१४ वर्षे महामार्ग अपूर्ण ठेवल्याबद्दल केवळ माफी न मागता कोकणवासीयांना मुंबई-गोवा महामार्गावर टोलमाफी द्यावी.अशी मागणी नाईक यांनी केली आहे.









