भात पिकासाठी आधुनिक व सेंद्रिय शेती तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक
कृषि विभागाचा पुढाकार; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
ओरोस खुर्द येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग, नैसर्गिक शेती मिशन सन- 2026-27 अंतर्गत आज शुक्रवारी ‘शेतकऱ्यांची शेतीशाळा’ (भात पिक) विविध कृषि तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शनाने उत्साहात संपन्न झाली. या शेतीशाळेला परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
याप्रसंगी कुडाळ तालुका कृषि अधिकारी श्री.भास्कर चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित कृषि विभागाच्या मंडळ कृषि अधिकारी श्री.तानाजी सगरे, कृषि वि. केंद्र शास्त्रज्ञ श्री.विकास धामापूरकर, उप कृषि अधिकारी श्रीम. श्रध्दा वाडेकर, सहाय्यक कृषि अधिकारी प्रिया खरवडे आणि कृषि सेवक निखिल ढोकणे यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन आणि संवाद सेतू कार्यक्रम आयोजित केला. शेतीशाळेची सुरुवात ICM टाळीने केली. नंतर प्रशिक्षणार्थी यांचे 5 गट करून ballet box test घेण्यात आली. उपस्थितांना श्री. धामापूरकर सर यांनी प्रयोगशाळेत तपासणीसाठी मातीचा नमुना अचूक पद्धतीने कसा घ्यावा, याचे तंत्र समजावून सांगण्यात आले. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आणि खतांचा संतुलित वापर करण्यासाठी माती परीक्षण किती गरजेचे आहे, यावर अधिकाऱ्यांनी भर दिला. श्रीम. श्रद्धा वाडेकर यांनी भात पिकाची निरोगी रोपवाटिका तयार करण्यासाठी 3% मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. हलकी, पोचट आणि रोगट बियाणे वेगळी करून दर्जेदार बियाण्यांची निवड कशी करावी, तसेच बियाणे पेरणीपूर्वी त्याची उगवण क्षमता तपासणे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे असते. गोणपाटावर भात बियाण्यांची उगवण क्षमता कशी तपासावी, याचे थेट प्रात्यक्षिक कृषि अधिकाऱ्यांनी करून दाखवले. श्रीम. प्रिया खरवडे यांनी दशपर्णी अर्क आणि गोकृपा अमृत प्रात्यक्षिक दाखविले. रासायनिक खते आणि कीटकनाशकांना सक्षम पर्याय म्हणून सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कीड नियंत्रणासाठी ‘दशपर्णी अर्क’ कसा तयार करावा आणि जमिनीचा कस सुधारण्यासाठी ‘गोकृपा अमृत’ चा वापर कसा करावा, याचे थेट प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले व त्याचे फायदे समजावून सांगण्यात आले. तसेच सांघिक खेळातून ‘संघटनेचे’ महत्त्व पटवून सांगितले. केवळ तांत्रिक मार्गदर्शनच नव्हे, तर शेतकऱ्यांमध्ये एकी आणि सहकार्याची भावना निर्माण व्हावी यासाठी एक विशेष सांघिक खेळ आयोजित करण्यात आला होता. या मनोरंजक खेळातून ‘शेतकरी संघटना’ आणि एकत्र येऊन काम करण्याचे काय फायदे होतात, हा मोलाचा संदेश अत्यंत सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला. या शेतीशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक कृषि अधिकारी प्रिया खरवडे आणि स्थानिक शेतकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील बहुसंख्य शेतकरी बांधव आणि भगिनी या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होते.









