ठळक घडामोडी

पिंगुळी बंगलो प्रकल्पावर सरपंचांचा खुलासा; फक्त बिनशेती रेखांकन परवानगीच दिली!

पाझर तलाव सुरक्षित; विरोधक राजकारण करत आहेत – सरपंच अजय आकेरकर

२५७ बंगल्यांमुळे विकास व रोजगार वाढणार; ग्रामपंचायतीची मांडली भूमिका

कुडाळ : प्रतिनिधी
     पिंगुळी पाझर तलावाच्या परिसरात होणाऱ्या नियोजित बंगलो प्रकल्पासाठी पिंगुळी ग्रामपंचायतीने फक्त बिनशेती रेखांकन परवानगी दिली आहे. पाझर तलावावर सुरु असलेली नळपाणी पुरवठा योजना सुस्थितीत ठेवून विकासकाने नियोजन करायचे आहे. त्या संदर्भात विकासकाने आपल्याला पत्रव्यवहार केलेला आहे, असे पिंगुळीचे सरपंच अजय आकेरकर यांनी स्पष्ट केले. या सर्व विषयात विरोधक पक्षीय राजकारण आणत आहेत, अशी टीका देखील श्री. आकरेकर यांनी विरोधकांवर केली. ग्राम पंचायत कार्यालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
        अलीकडेच पिंगुळीचे जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी पिंगुळी पाझर तलावाच्या सभोवताली होत असलेल्या बंगलो प्रकल्पामुळे नळपाणी योजना असलेल्या पाझर तलावाचे पाणी दूषित होईल अशी भीती व्यक्त केली होती. या प्रकल्पाला ग्रा.प. ने ना हरकत दाखल कसा दिला, असा त्यांनी सवाल उपस्थित केला होता आणि १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देखील दिला होता. याबाबत पिंगुळीचे सरपंच अजय आकेरकर यांनी ग्राम पंचायतीची भूमिका मांडून श्री. सडवेलकर यांच्या आरोपांचे खंडन केले. यावेळी ग्रा. प. सदस्य सागर रणसिंग, शशांक पिंगुळकर उपस्थित होते.
     अजय आकेरकर म्हणाले, नवनिर्वाचीत जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी राजकारण करू नये. उबाठा शिवसेनेला पिंगुळीत चांगले दिवस आल्याने सडवेलकर निवडून आले. त्यांनी गावच्या विकासाठी प्रयत्न करावा असा सल्ला श्री. अकेरकर यांनी त्यांना दिला.
     दरम्यान पाझर तलावाचे पाणी दूषित होण्याबाबत श्री. आकेरकर यांना विचारले असता, विकासकाकडून त्याबाबतचा कोणताही आराखडा पिंगुळी ग्राम पंचायतीला आला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सांडपाणी कसे सोडणार आपल्याला माहित नसल्याचे ते म्हणाले. पिंगुळी गावासाठी पाझर तलावाप्रमाणेच खोडदेश्वर नदी हा पाणी पुरवठा पर्याय आहे. पाझर तलावाचा वापर आम्ही राखीव पाणी साठा म्हणून करतो. पाझर तलावाची पाहणी केली असता अजून पर्यंत तरी पाणी चांगले आहे, कोणताही धोका नाही असे श्री. आकेरकर यांनी सांगितले. त्याशिवाय खोडदेश्वर बंधाऱ्यावर आमदार निलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे २० कोटीच्या पाण्याच्या प्रकल्पाची मागणी केली आहे. सध्या बोअरवेल साठी १३ लाखाची अंदाजपत्रक मंजूर आहे. त्यामुळे विस्तारत चाललेल्या पिंगुळीसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार नसल्याचे श्री. आकेरकर यांनी स्पष्ट केले.
    बंगलो प्रकल्पाच्या विकासकाने ग्राम पंचायतीकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. त्यांचा कोणत्याची प्रकारचा आराखडा ग्रा.प. कडे आलेला नाही. त्यामुळे सांडपाण्याचे नियोजन काय असेल ते अदयाप आमच्यापर्यंत आलेले नाही. प्रकल्पासाठी बिनशेती रेखांकन परवानगी दोन अटी घालून दिल्याचे श्री. आकेरकर म्हणाले. ग्राम पंचायतच्या नळ पाणी पुरवठा पाईप लाईन तिथून गेली असल्याने त्या सुस्थितीत ठेवण्याची अट घातली  असल्याचेही श्री. आकेरकर यांनी सांगितले.
       या संदर्भात खास सभा लावण्यात आली होती. त्याला १७ पैकी १३ ग्रा.प. सदस्य उपस्थित होते. तसेच या विषयावर एक ग्रामसभा सुद्धा झाली, असे सरपंच श्री. आकेरकर म्हणाले. येथे २५७ पेक्षा जास्त बंगलो प्रकल्प होत असतील तर त्यामुळे येथील व्यापार वाढेल, पिंगुळीला उर्जितवस्था येईल, रोजगार वाढेल  असा विश्वास श्री. आकेरकर यांनी व्यक्त केला. नियोजित प्रकल्पाच्या ठिकाणी काही झाडांची तोड झाली आहे, त्याबाबत विकासकाने वनविभागाची परवानगी घेऊन तोड केल्याचे श्री. आकेरकर यांनी सांगितले. या विषयासंदर्भात ग्राम पंचायत गावाच्या बाजूने ठाम उभी राहील असा विश्वास सरपंच अजय आकेरकर यांनी यावेळी व्यक्त केला.

error: Content is protected !!