कुडाळ नगरपंचायतीच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना
रस्ते, उद्याने विकासात विलंब सहन केला जाणार नाही – आ.राणे
कुडाळ : प्रतिनिधी
विकास कामे किती प्रगतीपथावर आहेत हे सांगण्यापेक्षा अस्तित्वात किती उतरवली ते सांगा. आतापर्यंत मी डेटलाइन ऐकत आलो आहे. यापुढे कामे पूर्णत्वास आलेली दिसली पाहिजे असे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ नगरपंचायतीच्या अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींना बजावले.
कुडाळ नगरपंचायतीच्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी आज गुरूवारी प्रशासन व नगरसेवकांची बैठक घेतली. यावेळी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मुख्याधिकारी विनायक औंधकर, नगरसेवक विलास कुडाळकर, अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, निलेश परब, उदय मांजरेकर, गणेश भोगटे, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, आफरीन करोल, अक्षता खटावकर, सई काळप, श्रुती वर्दम, ज्योती जळवी तसेच नगरपंचायतीचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीमध्ये आमदार निलेश राणे यांनी विकास कामांचा आढावा घेतला. या आढाव्यामध्ये प्रगतीपथावर झालेले कामे आणि पूर्णत्वास झालेल्या कामांची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली मात्र अनेक कामे विकास निधी असून सुद्धा पूर्णत्वास झाले नाहीत. यावर आमदार निलेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली. जी कामे प्रगतीपथावर आहेत ती लवकर पूर्ण करा अशा सूचना दिल्या शहरातील रस्ते, उद्याने विकसित करण्यासाठी वेळ काढू नका असेही त्यांनी यावेळी सांगितले.









